जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे : मुनीराज हंसबोधी विजयजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:04 AM2018-11-25T01:04:59+5:302018-11-25T01:05:45+5:30
मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे.
नाशिक : मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे. भगवान महावीर यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आदी जीवन मूल्यांचा अंगीकार आपण केलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जैन मुनीराज हंसबोधी विजयजी म.सा. यांनी केले आहे. रोटरी हॉल येथे सकाळी महावीर इंटरनॅशनलच्या वतीने यशस्वी चातुर्मास संपन्न झाला. त्याबद्दल गुरुंचा कृतज्ञता सोहळा (उपकार स्मृती) प्रसंगी महाराज बोलत होते. मुनीराज प.पू. मुक्तीभूषण विजयजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात प्रत्येक मानवाच्या जीवनात समर्पणाची भावना आली पाहिजे, असे सांगितले.
यावेळी प.पू. मुनीराज मैत्रिभूषण विजयजी महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाची अपेक्षा वाढते आहे. एकपद मिळालेली दुसऱ्या पदावर माणूस जातो. परंतु त्याबरोबर धर्माची शिदोरी कमी होत चालली याची खंत असल्याचे सांगून शांततेचे अधिष्ठान जप, तप, त्याग याला महत्त्व दिले पाहिजे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माजीमंत्री विनायकदादा पाटील यांनी जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्वाचे स्थान आहे. एकवेळ दीक्षा घेणे सोपे पण निभावणे कठीण असल्याचे सांगितले, तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी शास्त्रीयदृष्ट्यादेखील जैन धर्माचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे, असे सांगितले.
याप्रसंगी गौतम सुराणा राजेंद्र पारिक, प्रकाश बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत अनिल नहार यांनी केले. कार्यक्रमास बेबीलाल संचेती, राजेंद्र बाफना, पृथ्वीराज बोरा, विलासभाई शहा, प्रवीण शहा, शरदभाई शहा, महेश शहा, गिरीश शहा, भुपेंद्र शहा, अनुजभाई शहा आदिंसह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन इंटरनॅशनलच्या वतीने करण्यात आले होते.