भारत हाच सैनिकांचा धर्म : बिंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:34 AM2018-11-17T00:34:13+5:302018-11-17T00:34:45+5:30
भारतीय लष्करातील सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहे. मात्र प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेतल्यानंतर सैनिकांचा एकच धर्म आणि एकच राज्य ते म्हणजे भारत होय, असे प्रतिपादन तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांनी २१२ सैनिकांना शपथग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.
नाशिकरोड : भारतीय लष्करातील सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहे. मात्र प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेतल्यानंतर सैनिकांचा एकच धर्म आणि एकच राज्य ते म्हणजे भारत होय, असे प्रतिपादन तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांनी २१२ सैनिकांना शपथग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.
नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमधील उमराव परेड मैदानावर शुक्रवारी सकाळी २१२ प्रशिक्षणार्थींचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा म्हणाले की, भारतीय सैनिकांनी प्रत्येक वेळी आपले कौशल्य पणाला लावून देशाचे संरक्षण केले आहे. देश रक्षणासाठी जे आईवडील आपल्या मुलाला लष्करात पाठवतात त्यांचे ऋण बिंद्रा यांनी मानले. यावेळी ४४ आठवडे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या २१२ सैनिकांना शपथ देण्यात आली. ते सैनिक प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना नियुक्त केलेल्या जागी जाणार आहेत. शपथग्रहण सोहळ्याप्रसंगी सैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथग्रहण सोहळ्यानंतर सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला.
पुरस्कार प्राप्त प्रशिक्षणार्थी
शपथ ग्रहण सोहळ्यात
गौरव कुमार, साहीलकुमार,
अंकित यादव,
वांगेकर आनंदराव, राहुल, दासिया श्रीनू, सोनू, याकूब ओरान या सैनिकांना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून
गौरविण्यात आले.