जीवनात धर्माचे अधिष्ठान आवश्यक : पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:34 AM2018-12-22T00:34:44+5:302018-12-22T00:35:27+5:30
मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
नाशिक : मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. शुक्रवारी(दि.२१) सकाळी विविध कार्यक्र मांसाठी त्यांचे नाशिक शहरात आगमन झाले. त्यानंतर गंजमाळ येथून मिरवणुकीने मुनीजनांचे टिळकवाडी येथील भाविक आराधना भवन येथे आगमन झाले.
या मिरवणुकीत जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आराधना भवनात प्रवचनात आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, जीवन क्षणभंगूर असून मोहमाया, सत्ता, संपत्ती- ऐश्वर्य यापेक्षा सत्य अहिंसा, त्याग, दया यांचा उपयोग केला तर जीवनात एक वेगळेच समाधान मिळते. तसेच आपले भविष्य उज्ज्वल बनते.
सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक असून, धर्माशिवाय पर्याय नाही,असे प्रतिपादन त्यांनी केले.आचार्य परमपूज्य पुण्य पालसुरीजी म.सा. यांच्याबरोबर परमपूज्य आचार्य भुवन भूषण विजय जी म. सा. आचार्य वज्रभूषण विजयजी म.सा., आचार्य भव्यभूषण विजयजी म.सा., मुनिराज मुक्तिभूषण विजयजी म.सा., मैत्रिभूषण विजयजी म.सा, मुनिराज तीर्थभूषण विजयजी म.सा., तसेच जैन साध्वी हंस कीर्ती श्रीजी म.सा., अनेक साधुसंत उपस्थित होते.
दीक्षार्थी मोहमई संसाराचा त्याग करून २९ जण जैन धर्म शास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत.त्यांची ही मिरवणूक काढण्यात आली. दीक्षा ग्रहण समारंभ मुहूर्ता प्रमाणे होईल. परमपूज्य आचार्य पुण्यपाल सुरीजी म. सा. यांच्या उपस्थितीत देवळालीगाव येथे उपदानतपाचा जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होईल. सदर सोहळा यशस्वीसाठी प्रवीण शहा,महेश भाई शहा,शैलेश शहा,अनुज शहा, गौतम सुराणा,प्रकाश बोथरा,सीलकेश कोठारी, भुपेंद्र शहा, डॉ. विक्र म शहा, सुरेश शहा,जितूभाई शहा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
ठिकठिकाणी स्वागताच्या उभारल्या कमानी
परमपूज्य आचार्य भगवंत पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा शिष्य परिवार सुमारे १४०० साधू-साध्वींचा असून त्यांची सुमारे ६० वर्षांपूवी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे दीक्षा संपन्न झाली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व जैन समाजातील बांधवता आनंदाचे वातावरण पसरले होते.सकाळी गंजमाळ येथील सुविधींनाथ जैन मंदिरापासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या. विविध आकर्षक देखावे रांगोळीने सर्व रस्ते धर्ममय झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. नाशिकचा ढोल, लेजीम, आदिवासी नृत्य, तुतारी असे मिरवणुकीचे स्वरूप होते.