धर्मश्रद्धाही असावी कालसुसंगत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:18 PM2018-09-22T21:18:09+5:302018-09-23T01:24:17+5:30
भारतीय संस्कृतीत कोणत्याही मंगलमय कार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते. त्यातच गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव आणि भक्तांचा जल्लोष होय. बाप्पाच्या आगमनाने सारे वातावरण चैतन्यमय बनते. दहा दिवसांच्या या आनंदमय सोहळ्यानंतर आता वेळ आली आहे बाप्पाला निरोप देण्याची; परंतु गणेश विसर्जन करताना कोणतेही प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणाची हानीदेखील होणार नाही याची काळजी प्रत्येक भक्ताने घ्यायला हवी. गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून यासंबंधी अभियान राबविण्यात येत आहे. यासंदर्भात अंनिसचे राज्य मुख्य सचिव हमीद दाभोेलकर यांच्याशी साधलेला संवाद...
विशेष मुलाखत
अंनिसतर्फे दरवर्षी श्री गणेशमूर्ती दान ही संकल्पना राबविली जाते. याची नेमकी सुरुवात कशी झाली ?
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे असे असले तरी ते धर्मविरोधी नाही. अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला. धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करा आणि शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करा या विचारांमधूनच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे श्री गणेशोत्सव काळात श्री गणेशमूर्ती दान आणि निर्माल्यदान ही चळवळ सुरू केली. यापूर्वी सरळ नदी, तलाव, विहिरी या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या ठिकाणांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत असे; परंतु काही प्रमाणात हा विचार लोकांना हळूहळू पटू लागला. त्याचे रूप व्यापक होत गेले.
श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्यदानाच्या अभियानाला आता कसा प्रतिसाद मिळतो आहे ?
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उद्देश हाच मुळात व्यापक समाज परिवर्तनवादी चळवळीबरोबर सहयोग करीत सुधारणावादी कार्य पुढे नेणे असा असल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्या काळात मग दरवर्षी श्री गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती-निर्माल्यदान या अभियानाला व्यापक स्वरूप दिले. सुरुवातीला एक हजारांच्या आसपास असलेला मूर्तिदानाचा आकडा आता ५० हजार ते एक लाखांपेक्षा जास्त पुढे गेला आहे. नाशिक शहरात गेल्या वर्षी अंनिस आणि अन्य सहयोग सामाजिक संस्था-संघटनांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख श्री गणेशमूर्तींचे दान भाविकांकडून प्राप्त झाले होते. तद्वतच पुणे येथील मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या सार्वजनिक मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपल्या घरी पर्यावरणपूरक अशा पद्धतीने गणेश विसर्जन केले आहे. ग्रामीण भागातदेखील ही मूर्तिदानाची चळवळ व्यापक बनली आहे. या मूर्तींची शेतासाठी माती होते, तर निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यात येते.
प्रदूषण निर्मूलन आणि पर्यावरणाचे रक्षण अशी व्यापक चळवळ राबविताना आपल्याला काय अनुभव आले ?
- कोणताही नवीन विज्ञानवादी किंवा सुधारणावादी विचार राबविताना त्यात अनंत अडचणी येतात. हा आपल्या राज्याचा नव्हे तर देशाचादेखील इतिहास आहे; परंतु त्याचबरोबर सुधारणावादी चळवळीच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी अनेक माणसे आणि संस्था असतात. प्रस्थापित व्यवस्थेला नवीन विचाराबद्दल राग आणि द्वेष असू शकतो; परंतु विचारांचा मार्ग सोडायचा नाही. विचारांचा प्रतिकार विचारांनी करायचा ही शिकवण आम्हाला मिळाली. कुठलेही सामूहिक लढे हे इच्छाशक्तीचे प्रतीक असतात. आमचे नाते हे समविचारी लोक आणि संस्था यांच्याशी असून, तेच आमच्या चळवळीचे पाठबळ आहे. आम्ही नेहमीच सांगतो की आमचा धर्माला किंवा श्रद्धाला विरोध नाही तर अंधश्रद्धेला विरोध आहे. धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या थोतांडाला विरोध आहे. धर्मश्रद्धा ही कालसुसंगत असावी. ती पर्यावरणपूरकदेखील असावी.
समाजातील सर्व घटकांमधून तसेच शासकीय पातळीवर अंनिसच्या विचारांना आणि उपक्रमांना पाठिंबा मिळतो काय ?
- सण, उत्सव साजरा करताना प्रत्येक व्यक्ती आणि संघटना यांनी सामाजिक भान जपणे आवश्यकच आहे. श्री गणेश मूर्तिदान आणि निर्माल्यदान चळवळीने आता अत्यंत व्यापक रूप धारण केले असून, राज्यातील अनेक शाळांमधून शाडूमाती गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. इतकेच नव्हे तर मुले आपल्या घरी पालकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह करतात. तसेच घराच्या नजीक किंवा बागेतच एखाद्या ड्रममध्ये प्रतीकात्मक गणेश विसर्जन करतात. मला वाटते पुढील पिढ्यांसाठी अत्यंत चांगला संदेश देण्यात येत आहे. त्यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक मोठ्या प्रमाणावर दृढ होईल, असा विश्वास वाटतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील ‘इको-फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन २००२ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार प्लॅस्टर आॅफ पॅरिसमध्ये (पीओपी) तयार झालेल्या मूर्ती तसेच रासायनिक रंगांचा वापर करण्याला निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनातील सर्वच विभागांना यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे समाजाचा आणि शासनाचा आमच्या चळवळीला पाठिंबा मिळालेला आहे. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर होळी आणि दिवाळी हे सणदेखील पर्यावरणपूरक साजरे व्हावेत असा आमचा आग्रह असतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी झाडे तोडण्याऐवजी कचºयाची होळी करणे आणि पुरणपोळी होळीत टाकण्याऐवजी गरिबांना वाटणे असा उपक्रम आम्ही राबवित असतो. ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठीही आम्ही आवाहन करीत असतो.