ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:35 AM2019-03-25T00:35:37+5:302019-03-25T00:36:04+5:30
ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
नाशिक : ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात विवेकधाराच्या वतीने रविवारी (दि.२४) आयोजित पाचव्या नास्तिक मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी कसबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी कसबे यांनी ‘नास्तिकता : एक जीवनशैली’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पृथ्वीवर दहा लाख वर्षांपूर्वी मानवजाती निर्माण झाली. खरोखर ईश्वर असता तर त्याने त्यापूर्वीच माणूस का बनवला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ‘ईश्वराने माणसाची निर्मिती केली’ हे विधान मान्य करण्यासारखे नाही. ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यास प्रारंभ करायला हवा. माणसाला अन्य कोणत्याही शक्तीने मदत करता तो स्वत:च्या प्रयत्नाने माणूस झाला व त्याने वेगळे जग निर्माण केले. ईश्वरी कल्पना मानवनिर्मित असून, माणूस ईश्वराचा निर्माता आहे, असेही कसबे यांनी यावेळी अधोरेखित केले. लोकेश शेवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रियदर्शन भारतीय यांनी आभार मानले.
पालकांचे वर्तन महत्त्वाचे
मुलांवर नास्तिकतेचे संस्कार करताना पालकांचे वर्तन व संवाद महत्त्वाचा असल्याचा सूर परिसंवादातून उमटला. ‘नास्तिक पालकत्व : जबाबदारी व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद यावेळी पार पडला. त्यात लेखक प्रा. अभिजित देशपांडे, मानसशास्त्रज्ञ आशिष कोरडे, स्तंभलेखक योगेश गायकवाड व लेखिका गौरी पटवर्धन यांनी सहभाग घेतला.