श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:15 AM2019-04-19T00:15:44+5:302019-04-19T00:17:01+5:30
: श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नाशिक : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जुन्या आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात येत्या शुक्रवारी (दि.१९) हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महंत भक्तिचरणदास महाराज यांनी दिली आहे. पंचवटीतील जुना आडगाव नाका येथे प्रसिद्ध व प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्र वारी पहाटेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न होतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सवनिमित्त शुक्रवारी पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ६ वाजता आरती, सकाळी ७ वाजता सामुदायिक हनुमान चालीसा पठण, सकाळी १० वाजता सुंदरकांड हवन, दुपारी १२ वाजता आरती, सकाळच्या आरतीनंतर दिवसभर लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
नरसिंहनगर, गंगापूररोड येथील नसती उठाठेव मित्रपरिवारातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्याने होत असून, शुक्रवारी सकाळी ६.२७ वाजता जन्मोत्सव सोहळा होणार आहे. नंदिनी गोशाळा आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पूर्णाहुती व आरती संपन्न होणार आहे. तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
श्री सिद्ध हनुमान देवस्थान श्रीक्षेत्र अंजनेरी येथे सकाळी ६.१५ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. तसेच महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मुंबईनाका येथील श्री पवनपुत्र हनुमान बहुउद्देशीय सेवाभावी मंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़
चौक मंडई, वझरेरोड, फुलमाळी मंच ट्रस्ट, दक्षिणमुखी हनुमान मंदिर जन्मोत्सवासाठी सज्ज झाले आहे. शुक्रवारी सकाळी जन्मोत्सव सोहळ्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या मंदिराला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. प्रत्येक वर्षी हनुमान
जयंतीला मूर्तीस सोन्या-चांदीचे दागिने व हिरेजडीत रत्नांनी सजविले जाते. जन्मोत्सवासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती फुलमाळी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक वझरे यांनी दिली.
समर्थ रामदास स्वामी मठ टाकळी
हनुमान जयंतीनिमित्त श्री समर्थ रामदास स्वामी मठ टाकळी येथे शुक्रवारी (दि. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.१९ वाजता जन्मोत्सव, दुपारी ११.४५ पर्यंत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी महाआरती, भंडारा, भजन सेवा व भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एस. टी. पांडे, विश्वस्त सुधीर शिरवाडकर आदींनी केले आहे.