श्रावणमासानिमित्त उत्तर भारतीयांकडून धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:20 AM2018-08-07T01:20:13+5:302018-08-07T01:20:41+5:30
उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला असून, शहरात लाखाच्या संख्येने स्थायिक असणाऱ्या उत्तर भारतीयांकडून श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे.
नाशिक : उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला असून, शहरात लाखाच्या संख्येने स्थायिक असणाऱ्या उत्तर भारतीयांकडून श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्त्व आहे. बिहारमधील बाबा वैजनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणे याला सर्वाधिक महत्त्व आहे पण ज्यांना नोकरी, व्यवसायामुळे तेथे जाणे शक्य नाही ते भाविक त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर, सोमेश्वर आदी ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यावर लघुरुद्र, महारुद्र, अभिषेक आदी विधी करून घेण्यावर भर देत आहेत. गोदाघाट, कुशावर्त, सोमेश्वर आदी ठिकाणी गंगास्नान, गंगापूजन, दीपदानही आवर्जून केले जात आहे. उत्तर भारतीय बांधवांकडून श्रावणमास सुरू होताच दर सोमवारी उपवास, महादेवाचे दर्शन, दानधर्म आदी गोष्टी आवर्जून केल्या जात आहेत. पुरोहितांकडून पूजा अर्चाही करून घेतली जात आहे. या महिन्यात सोळा सोमवार व्रताला प्रारंभही केला जातो. महाराष्टत श्रावण महिना रविवार (दि.१२) पासून सुरू होत आहे.