रेमडेसिवीर वितरणातील गोंधळ उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:56+5:302021-04-09T04:15:56+5:30
नाशिक: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत गैरप्रकार होत असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त होत असतानाच मालेगाव शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत रेमडेसिवीर ...
नाशिक: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत गैरप्रकार होत असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त होत असतानाच मालेगाव शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत रेमडेसिवीर वितरणातील गोंधळ उघड झाला आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत मेडिकल दुकानदारांनी रेमडेसिवीर जादा दराने विक्री केल्याचे तसेच पुरेसे कागदपत्रे न तपासता वितरित केल्याची बाब पुढे आली आहे.
मालेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मालेगाव शहरातील चार मेडिकल दुकानदारांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आली. ज्या रुग्णांना रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले, त्यातील काही रुग्णांचा एचआरसीटी तसेच आरटीपीसीआर रिपोर्ट संबंधित मेडिकलच्या फाईलमध्ये आढळून आलेला नाही. व्हॉटसॲप ग्रुपवर स्टॉक ४० दाखविलेला असताना प्रत्यक्षात मात्र १२० आढळून आला. याबाबत संबंधित दुकानदाराकडून माहिती दडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले.
अन्य एका मेडिकलच्या दुकानात सवलतीच्या दरात पुरविण्यात आलेले रेमडेसिवीर १२०० रुपयांमध्ये विकणे अपेक्षित असताना ४८०० रूपयांचे बिल दिले गेल्याचे पाहणीत आढळले.
एचआरसीटीचा रिपोर्ट, डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन आणि रुग्णाचे आधारकार्ड असेल तरच रेमडेसिवीर देण्यात यावे असा नियम असतानाही केवळ आधारकार्ड आणि डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनवर रेमडेसिवीर देण्यात आल्याचे लक्षात आले आहे. काही मेडिकल्समध्येही विना एचआरसीटी, आरटीपीसीआर रेमडेसिवीर देण्यात आले आहे. या सर्व दुकानदारांना आता नोटिसा देण्यात आलेल्या असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.
--कोट--
रेमडेसिवीर वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार दिसून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत यापुढे संबंधिताविरोधात फौजदारी कारवाई केली जाईल. व्यावसायिकांनी या कठीण प्रसंगी नागरिकांच्या हितार्थ काम करणे अपेक्षित आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.