दोन टक्के मुद्रांक सवलतीचे उरले सात दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:49+5:302021-03-24T04:13:49+5:30

नाशिक : कोरोनामुळे मंदीच्या चक्रात रुतू पाहणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात ३१ डिसेंबरपर्यंत तीन ...

The remaining seven days of the two per cent stamp discount | दोन टक्के मुद्रांक सवलतीचे उरले सात दिवस

दोन टक्के मुद्रांक सवलतीचे उरले सात दिवस

Next

नाशिक : कोरोनामुळे मंदीच्या चक्रात रुतू पाहणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के सवलत दिली होती. मात्र ३१ डिसेंबरनंतर यात एक टक्क्याने कपात करून ३१ मार्चपर्यंत दोन टक्के सवलत देण्यात आली होती. आता ३१ मार्चला ही सवलत संपुष्टात येणार असून, दोन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी अवघे सात दिवस उरले आहेत; त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन असे व्यवहार करणाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्काची रक्कम भरून उर्वरित दस्तनोंदणीची प्रक्रिया पुढील चार महिन्यांच्या कालावधीत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सात उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागत असताना व्यवहार पूर्ण झालेले ग्राहक कागदपत्रांची पूर्तता आणि वेगवेगळ्या तांत्रिक कारणांनी दस्तनोंदणी करू शकत नसल्याने, त्यांनी आता मुद्रांक शुल्क भरून उर्वरित प्रक्रिया पुढील १२० दिवसांत पूर्ण करून दोन टक्के सवलत मिळविता येणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी नाेंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनाेंदणी प्रक्रिया पूर्ण करीत, सध्या सुरू असलेल्या दोन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेता येणार असल्याने, अनेक ग्राहकांचा मुद्रांक शुल्क भरण्याकडे कल दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा अधिकाधिक ग्राहकांना मिळावा, यासाठी उपनिबंधक कार्यालयांच्या कामकाजाची वेळही वाढविण्यात आली आहे.

इन्फो-

घरखरेदीला चालना

सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घरखरेदीला चालना मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शासनालाही मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. मुद्रांक शुल्कातील दोन टक्के सवलचीचा लाभ ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत घेता येणार असून ग्राहकांना ४ टक्के मुद्रांक शुल्क भरून खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत.

इन्फो-

मुद्रांक शुल्क कपातीनंतर दस्तनोंदणी

महिना - दस्त नोंद - महसूल (रुपयांमध्ये)

सप्टेंबर - ११,४७२ - ५३ कोटी ६५ लाख

ऑक्टोबर - १३,३७२ - ६८ कोटी २१ लाख

नोव्हेंबर - १२,५७८ - ५५ कोटी ७० लाख

डिसेंबर - २१००२- १८७ कोटी २८ लाख

जानेवारी - १४५४८- ८४ कोटी ८१ लाख

फेब्रुवारी - १५९८० -५६ कोटी ९६ लाख

कोट-

यापूर्वी ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्या ग्राहकांची दस्तनोंदणीसाठी घाई सुरू आहे. त्याचप्रमाणे दोन टक्के सवलत मिळविण्यासाठीही नागरिकांची घाई सुरू असल्याने नोंदणी शु्ल्क विभागाच्या प्रणालीवर ताण निर्माण होत असून, सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. मात्र सध्या बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना दोन टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा समजावून देत मुद्रांक शुल्क भरण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.

- रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक मेट्रो.

कोट-

घरासाठी बुकिंग केलेल्या ग्राहकांची दस्तनोंदणीसाठी गर्दी होत असल्यामुळे सर्व्हरला तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकही कोरोनाच्या संकटाने त्रस्त झाले आहेत. कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने सरकारने मुद्रांक शुल्काची सवलत आणखी सहा महिन्यांसाठी वाढवून देण्याची गरज आहे.

- अभय तातेड, अध्यक्ष नरेडको, नाशिक

Web Title: The remaining seven days of the two per cent stamp discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.