बाणगंगाकाठच्या गावांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:24 PM2019-06-05T23:24:48+5:302019-06-05T23:25:40+5:30
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

बाणगंगा काठावरील दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, ओणे, थेरगाव, कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या सर्व गावांचा पाणीपुरवठा हा बाणगंगेच्या काठावर असलेल्या विहिरींवर आधारित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाणगंगा कोरडीठाक पडल्याने बाणगंगा काठच्या सात गावांतील शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. द्राक्षबागा, फूलशेती कोमजली असून, जनावरांचेही पाण्यासाठी हाल होत आहे.
पाण्यासाठी नागरिक दररोज भटकंती करीत आहे. टंचाईची गंभीर परिस्थितीची पाहणी करून आमदार अनिल कदम यांनी कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार रविवारपासून (दि.२) गंगापूर धरणातून डाव्या कालव्यातून बाणगंगेला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
सोमवारी दुपारपर्यंत पाणी दात्याने बंधाºयापर्यंत पोहचले होते. बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. गंगापूर धरणातून डाव्या कालव्याला १७५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, बाणगंगा काठावरील गावांना पिण्यासाठी बाणगंगेत ७० क्यूसेक, तर १६ नंबर चारीला २५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (दि.५) सकाळी मौजे व कसबे-सुकेणेला पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दोन्हीही बंधारे भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मौजे सुकेणेचे विलास गडाख यांनी सपत्निक बाणगंगेचे पाणी पूजन केले.