उपाध्याय यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे
By admin | Published: July 18, 2016 12:37 AM2016-07-18T00:37:10+5:302016-07-18T00:40:12+5:30
विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप
नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला देशभरात मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या बलिदानाचे स्मरण करीत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.
रावसाहेब सभागृहात पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय : राष्ट्र समर्पित जीवन’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, यशवंत पाटील, श्रीकांत बेनी, धनपाल शाह, नितीन महाजन, नाना शिलेदार, चतूर नेरे, राहुल निर्भवणे, नगरसेवक सतीश सोनवणे आदि प्रमुख पाहुण्यांसह आमदार सीमा हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी घळसासी यांनी दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट व त्यांची विचारसरणीविषयी उपस्थितांना परिचय करून दिला. ते म्हणाले, भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून ते आजच्या भारतीय जनता पार्टीच्या यशामागे पं. दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, सुंदरसिंग भंडारी यांसारख्या राष्ट्राप्रति जीवन समर्पित करणाऱ्या नेत्यांचे बलिदान आहे.
जनसंघाने स्थापनेपासून बलिदानच मागितले. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्षपदाची सूत्र सांभाळताना बलिदानाची तयारी असल्याचे विधान केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. त्यामुळे अशा राष्ट्राप्रति समर्पित भावनेतून दिलेल्या बलिदानाच्या पायावर उभ्या असलेल्या सत्तेने हुरळून न जाता भारतीय जनता पार्टीच्या कार्यर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)