शहरातील विविध चर्चमध्ये ‘गुड फ्रायडे’निमित्त स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:51 AM2018-03-31T00:51:52+5:302018-03-31T00:51:52+5:30
सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजला जाणारा ‘गुड फ्रायडे’ शुक्रवारी (दि.३०) दिवस शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी युवकांनी पथनाट्याद्वारे येशुंच्या सुळावर चढविल्याचा प्रसंग भाविकांसमोर सादर करण्यात आला.
नाशिक : सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजला जाणारा ‘गुड फ्रायडे’ शुक्रवारी (दि.३०) दिवस शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी युवकांनी पथनाट्याद्वारे येशुंच्या सुळावर चढविल्याचा प्रसंग भाविकांसमोर सादर करण्यात आला. त्यानंतर मुख्य धर्मगुरू फादर ब्रायन डिसोझा, केनेथ डिसोझा, फादर वेन्स्ली डिमेलो यांनी विशेष प्रार्थना, मार्गदर्शन केले. गुड फ्रायडेनिमित्त रक्तदान शिबिर, तपसाधना व वंचितांसोबत भोजन आदी उपक्रम राबविण्यात आले. संध्याकाळी येशूंच्या बलिदानाची आठवण हा कार्यक्रम झाला. संत आंद्रिया चर्चमध्ये सकाळी ७ वाजता क्रॉसची रॅली काढण्यात आली होती. चर्चपासून शरणपूर परिसरात ही रॅली फिरवण्यात आली व चर्चमध्ये त्याचा समारोप करण्यात आला.
नाशिकरोड : गुड फ्रायडे दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी जेलरोड येथे ख्रिस्ती बांधवांनी क्रॉस पुढे हातात पकडून दु:खसदन यात्रा काढली होती. भगवान येशूला वध स्तंभावर खिळून ठार मारले होते. तो दिन ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे म्हणून साजरा करतात. जेलरोड येथील संत आण्णा महामंदिर येथून शुक्रवारी सकाळी ख्रिस्ती बांधवांनी क्रॉस हातात घेऊन पेंढारकर कॉलनी, उत्सव हॉल, शांती कृपा सोसायटी, जेलरोड कोठारी शाळामार्गे पुन्हा महामंदिरपर्यंत दु:ख सदन यात्रा काढली होती. त्यानंतर महामंदिरमध्ये भक्ती प्रार्थना करण्यात आली. दुपारी प्रवचन झाले. नेहरूनगर येथील बाल येशू प्रार्थना मंदिर, मुक्तिधामसमोरील सेंट फिलीप चर्च, देवळाली कॅम्प सेंट पॅट्रिक चर्च, गॅरीसन चर्च येथेदेखील गुड फ्रायडेनिमित्त भक्ती प्रार्थना करण्यात आली.