पंचवटीतील दुभाजकांची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:36+5:302021-03-05T04:15:36+5:30
मेन रोडला विक्रेत्यांचे अतिक्रमण नाशिक : बाजारपेेठेतील मेन रोडवर विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी या परिसरात ...
मेन रोडला विक्रेत्यांचे अतिक्रमण
नाशिक : बाजारपेेठेतील मेन रोडवर विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी या परिसरात गर्दी होणे योग्य नाही. महानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी अनेकदा कारवाई करुन विक्रेत्यांना हटवले होते. मात्र, भाजीवाल्यांसोबत अन्य विक्रेत्यांनी या भागात अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने लावण्यास सुरूवात केल्याने पुन्हा अतिक्रमण वाढले आहे.
रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
नाशिक : जुने नाशिक, भद्रकाली परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरीकांनाही त्यांची भीती वाटत आहे. बाजारात येणाऱ्या नागरीकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्त्यावर टाकलेले शिळे अन्न, दुकानांतून फेकले जाणारे पदार्थ यामुळे कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उद्यानांमध्ये वाढले गवत
नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उद्यानांमधील गवत काढून उद्याने पुन्हा सुशोभित करावीत, तसेच परिसरात धूरफवारणी करुन डासांचा उपद्रव कमी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
नाशिक : शहरातील सातपूर भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गुरांच्या झुंडी रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे कधी तर नागरिकांचे अपघातदेखील होतात.
थुंकणाऱ्यांवर व्हावी कठोर कारावाई
नाशिक : अद्यापही कोरोनाचे थैमान सुरुच असल्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्या मास्क न लावल्यास कारवाई होते. मात्र, मास्क बाजूला सारुन रस्त्यावर पचापच थुंकणाऱ्या नागरिकांना दंड झाल्याचे दिसत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
शिंगाडा तलाव परिसराला पुन्हा वाहनांचा गराडा
नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील रस्त्यावर नागरिकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. बरेचदा वादावादीचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील दुकानांसमोरील अनधिकृत वाहनतळांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.