खासगीकरणातून काढणार धरणातील रेती, गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:53 AM2017-07-20T00:53:12+5:302017-07-20T00:53:28+5:30
आठवडाभरात निविदा : गिरणासह राज्यातील पाच धरणांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यातील धरणांमध्ये गाळ व रेती साठल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे, नवीन धरणे बांधणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच मोठ्या धरणांमधील गाळ व रेती काढण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, त्यातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ व सरकारला रेती उत्खननातून पैसा मिळणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या पाच धरणांमध्ये नाशिक जिल्ह्णातील गिरणासह हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द व उजनीचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील धरणांची पाणी साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे हाच एकमेव उपाय आहे. नवीन धरणे बांधण्यासाठी भूसंपादन, निधी, पर्यावरणाची हानी, जमीन मालकांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्यातील काही धरणांची कामे गेल्या चाळीस वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाहीत परिणामी पाण्याचा प्रश्न कायम राहिला तसेच त्यावरील खर्चही वाया गेला आहे. ते टाळण्यासाठी नवीन धरणे बांधण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणाहून नवीन धरणांची मागणी होईल त्या ठिकाणच्या धरणांमधील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. खासगीकरणातून धरणांमधील गाळ व रेती काढण्याबाबत जलसंपदा विभागाने प्रस्ताव तयार केला
असून, त्यासाठी ठेका दिला
जाईल. ठेकेदारांनी धरणामध्ये किती गाळ व रेती आहे. याचा अभ्यास करून त्यासाठी निविदा भरतील व धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाईल तर रेती विक्रीतून काही रक्कम ठेकेदार व काही रक्कम राज्य सरकारला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील गिरणा, उजनी, हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द या धरणांना प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या संदर्भातील निविदा काढण्यात येईल, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहूनच आगामी सहा महिन्यांत टप्पाटप्प्याने संपूर्ण राज्यातील धरणांमधील गाळ काढण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविल्यामुळे बऱ्याचशा प्रकल्पांमधून लोकसहभागातून गाळ काढला गेला आहे, त्याचा लाभ पाण्याच्या साठवण क्षमतेवर झाला असल्याची माहितीही जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी दिली. राज्यात सर्वाधिक गाळ नाशिक जिल्ह्णात काढला गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.