जलयुक्तमधून गाळ काढण्याची कामे वगळली
By admin | Published: July 21, 2016 01:10 AM2016-07-21T01:10:28+5:302016-07-21T01:13:20+5:30
सदस्यांना धक्का : नव्याने प्रस्ताव करावे लागणार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेसमधून राखीव ठेवण्यात आलेल्या सुमारे अडीच कोटींच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमधून बंधारे आणि पाझरतलावांमधून गाळ काढण्याची तसेच खोलीकरणाची कामे वगळण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी
दिली.
जिल्हा परिषदेच्या वतीने सेसमधून राखीव ठेवण्यात आलेल्या सुमारे अडीच कोटींच्या निधीतून ७६ कामांचे प्रस्ताव लघुपाटबंधारे विभागाने तयार केले होते; मात्र या प्रस्तावांमध्ये काही कामे ही जलयुक्त शिवार अभियानातील मंजूर आराखड्यातील नसल्याचे कारण देत ही कामे मंजूर करण्यास जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने नकार दिला होता. तसेच हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हा रोजगार हमी विभागाकडे या कामांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावर रोहयो उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी ही कामे मंजूर करण्यासाठी १० प्रकारच्या अटी-शर्ती घालून दिल्या होत्या.
त्या अटी-शर्तींमध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनेतून गाळ काढणे व खोलीकरण करणे ही कामे वगळण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने सादर केलेल्या ७६ कामांपैकी बहुतांश कामे मंजूर करण्यात आली असल्याचे मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे; मात्र त्यातील आराखड्यात समाविष्ट नसलेल्या कोटा बंधारे, गावतळे आणि पाझर तलावातील गाळ काढणे तसेच खोलीकरण करणे ही कामे वगळण्यात आल्याने त्याऐवजी दुसरे प्रस्ताव सुचविण्यास सदस्यांना सूचना करण्यात आल्याचे शंभरकर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)