अतिक्रमण हटवू मात्र, फोन करून अडवू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:06+5:302020-12-17T04:41:06+5:30
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीची बैठक सभापती ॲड. वैशाली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १६) पार पाडली. यावेळी अतिक्रमणाबाबत चर्चा ...
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीची बैठक सभापती ॲड. वैशाली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १६) पार पाडली. यावेळी अतिक्रमणाबाबत चर्चा झाली. मेनरोड आणि अन्य भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असून ती हटवली जात नसल्याने अतिक्रमण विभागाच्या प्रमुखास बैठकीस बोलावण्यात आले. अतिक्रमण हटवण्यास आम्ही गेलो की कारवाई करू नका म्हणून फोन येतात. ते थांबले तर एका महिन्यात मेनरोड साफ हाेईल असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. गजानन शेलार यांनी कोणाचे फोन येतात विचारल्यानंतर देखील सर्वांचेच फोन येतात असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. यावर नगरसेवकांची अडचण झाली, परंतु काहींनी फक्त मेनरोड, बोहोरपट्टी आणि सराफ बाजारच क्लीअर करा सांगितले तरी काहींनी परप्रांतीय फेरीवाल्यांनाच हटवा असाही अजब सल्ला दिला; मात्र अशाप्रकारे फेरीवाल्यांना विचारून कारवाई करता येत नसल्याचे स्पष्ट केले. अतिक्रमण हटत नसेल तर जप्त साहित्याला तेथेच पेटवून द्या असा सल्लाही एका नगरसेवकाने दिला.
इन्फो..
रिक्षातून जाऊन कारवाईचा गनिमी कावा
मनपाच्या अतिक्रमण विभागाचे वाहन दिसल्यास फेरीवाले पळून जातात. त्यामुळे कर्मचारी आता रिक्षेने प्रवास करून तेथे पोहोचतात, कारवाई सुरू केल्यानंतर वाहन बोलावले जाते असे पथक प्रमुखाने सांगितले.
इन्फो..
हॉकर्स झोन रद्द मग फेरीवाले कोठे जाणार
शहरातील हॉकर्स झोन रद्द केले मग अधिकृत परवानाधारक फेरीवाल्यांनी कुठे जायचे असा प्रश्न समीर कांबळे यांनी केला. तर महात्मा नगर येथील फेरीवाला झोन रद्द करण्यावरून कांबळे- शिवाजी गांगुर्डे यांचेही प्रश्न उत्तरे झाली. महात्मा नगर येथील फेरीवाला क्षेत्रात चार विक्रेत्यांना मंजुरी असताना तेथे ही संख्या वाढल्याने नागरीकांना उद्यानात जाता येत नव्हते असे सांगून तेथील फेरीवाला क्षेत्र रद्द करण्याचे गांगुर्डे यांनी समर्थन केले.