इंग्रजी पाट्या काढा

By admin | Published: September 27, 2015 12:04 AM2015-09-27T00:04:36+5:302015-09-27T00:06:19+5:30

राज ठाकरे : चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कचे उद्घाटन

Remove the English ladders | इंग्रजी पाट्या काढा

इंग्रजी पाट्या काढा

Next

नाशिक : सर्वांना मराठी चांगले कळते व समजते, त्यामुळे उगीचच इंग्रजीतून बोलून वा लिहून मराठमोळ्या नाशिकला कॉस्मोपॉलिटीयन बनवू नका व चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कमध्ये लावण्यात आलेल्या इंग्रजीतील पाट्या तत्काळ बदलून टाका अशा शब्दात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले.
तिडके कॉलनीत नाशिक फर्स्ट संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय संयोजकांकडून इंग्रजीतून करण्यात येत होता, त्याचा धागा पकडून ठाकरे यांनी, भाषणाच्या प्रारंभीच नाशिक फर्स्टच्या सदस्यांना आपल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत असे नमूद केले व चांगलेच फैलावर घेतले. येत्या दोन तारखेला आपण पुन्हा नाशिकला येणार असून, तोपर्यंत पार्कमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या इंग्रजीतील पाट्या बदलून टाका, अशी सूचना करतानाच नाशिक फर्स्टने या पार्कसाठी पुढाकार घेतला असला तरी, नाशिक फर्स्ट नव्हे, तर ‘नाशिक महापालिका फर्स्ट’असून, सुमारे ५० कोटी रुपये किमतीची तीन एकर महापालिकेच्या मालकीची जागा दिल्यानेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला अशी पुष्टीही जोडली व संपूर्ण कार्यक्रमात कोठेही महापालिकेचा उल्लेख नसल्याबद्दलची खंतही व्यक्तकेली.
मराठी ही राजभाषा असून, त्याचे शिक्षणही मराठीत दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ठाकरे यांनी राज्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट असून, पूर्वीच्या सरकारचे वारंवार याकडे लक्ष वेधूनही कुंभकर्णी सरकार जागे झाले नाही, असे सांगितले. मुळात वाहतूक व्यवस्थेची काळजी वाहणाऱ्या वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नसून, दोषी व्यक्ती शंभर, पन्नास रुपये हातावर टेकवून निघून जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अधिकार दिले जावे, अशी मागणी केली. नाशिकचा येत्या वर्षभरात कायापालट झालेला दिसेल याचा पुनरुच्चार करतानाच गोदावरी नदीत शंभर फुटाचे दोन ‘जिनिव्हा फाऊंटन’ करणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली.
यावेळी बोलताना माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांनी, चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कचे कौतुक करून संपूर्ण देशासाठी तो रोल मॉडेल होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर अशोक मुर्तडक यांनी या पार्कसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या कार्मिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव दुबे, ‘लॉर्ड’चे विलास ढवळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचलन जितेंद्र शिर्के यांनी केले.
कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, पोलीस आयुक्तएस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, सुजाता डेरे, सुनीता मोटकरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Remove the English ladders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.