सात अनधिकृत धार्मिक स्थळे काढणार
By admin | Published: October 27, 2016 12:12 AM2016-10-27T00:12:03+5:302016-10-27T00:12:32+5:30
सात अनधिकृत धार्मिक स्थळे काढणार
नाशिक : न्यायालयाच्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या ३१ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी आता फक्त सात धार्मिक स्थळे काढण्याची कार्यवाही प्रशासन करीत असून, बुधवारी सिन्नर शहरातील चार स्थळे अशाच प्रकारे काढून टाकण्यात आली आहेत. अनधिकृत जागेवर तसेच रहदारीला अडथळे ठरू पाहणाऱ्या धार्मिक स्थळांची वर्गवारी करून ती काढून टाकण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना असून, त्यानुसार राज्य सरकारने सर्वच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना अशा प्रकारच्या धार्मिक स्थळांचा शोध घेऊन कायद्याने ती अधिकृत करता येत असतील तर कायदेशीर करणे व अनधिकृत असतील तर काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक व मालेगाव या दोन महापालिका वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यापैकी १९ स्थळे अलीकडेच हटविण्यात आली असून, उर्वरित ११ पैकी चार स्थळे बुधवारी सिन्नर येथे काढून टाकण्यात आली. प्रांत अधिकारी महेश पाटील, तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व नागरिकांना विश्वासात घेऊन ही कार्यवाही करण्यात आली. आता सात स्थळे अनधिकृत असून, ती नांदगाव, मनमाड व बागलाण या ठिकाणी आहेत. न्यायालयाने ३१ आॅक्टोबर ही अंतिम मुदत दिली असल्याने तत्पूर्वी ती काढण्याची कार्यवाही केली जाणार आहे.