परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग्ज काढणार, ठेकेदाराने ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून केली कोट्यवधींची कमाई
By Suyog.joshi | Published: April 5, 2024 03:50 PM2024-04-05T15:50:36+5:302024-04-05T15:50:54+5:30
शहरात अवघ्या २८ ठिकाणी होर्डिंग्जसाठी परवानगी दिलेली असताना ठेकेदाराने चक्क ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून कोट्यवधींची कमाई केली आहे.
नाशिक : शहरात अवघ्या २८ ठिकाणी होर्डिंग्जसाठी परवानगी दिलेली असताना ठेकेदाराने चक्क ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून कोट्यवधींची कमाई केली आहे. आणखीन १५ ठिकाणी अधिकृत परवानगी घेऊन, तर ११ ठिकाणी परवानगी मिळवण्यापूर्वीच होर्डिंग्ज लावले आहेत. परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग्ज काढले जाणार असून, उर्वरित होर्डिंग्जबाबत दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटिसा ठेकेदाराला बजावल्याची माहिती विविध कर विभागाचे प्रभारी उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली.महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डिंग्ज घोटाळा केल्याचा आरोप नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टाईजिंग वेल्फेअर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला होता.
शहराचे विद्रुपीकरण
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, शहरात मोठ्या प्रमाणावर लावण्यात येत असलेले होर्डिंग्ज, बॅनर आणि फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. महापालिकेने १६ डिसेंबर २०१९ ला निविदा काढत ठेकेदाराला २८ ठिकाणी परवानगी दिली होती. परंतु, शहर आंदण दिल्यासारखे ठेकेदाराने वाहतूक बेट, पदपथ, तसेच खासगी मार्जिन स्पेसमध्येही होर्डिंग व जाहिरात फलक लावून पालिकेला कोट्यवधींचा चुना लावला.
जाहिरात स्पाॅटसाठी जागा शोधणार
मुंबई, ठाणे या महापालिकांना जाहिरात फलकातून कोट्यवधीचा महसूल मिळतो. नाशिक शहरही वेगाने विस्तारत असून, नवीन निविदेत अशा जाहिरात स्पाॅटसाठी नवनव्या जागांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात जाहिरात फलकातून भरघोस वाढ होईल. मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला ३० सप्टेंबर २०३२ पर्यंत हा ठेका देण्यात आला होता. ठेका रद्द केल्यानंतर नव्याने जाहिरात फलकांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.