अवघ्या दोन तासांत हटविले गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:49 AM2018-11-22T00:49:44+5:302018-11-22T00:50:01+5:30
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़
पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़ त्यामुळे नागरिकांच्या जिवापेक्षा महापालिकेने परवानगीचा मुद्दा पुढे करून ही कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़ दरम्यान, यामुळे महापालिका व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता असून, मनपाच्या या कृत्यावर सोशल मीडियामधून संताप व्यक्त केला जात आहे़
तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने अपघाताचा हॉट स्पॉट म्हणून तारवालानगर चौफुलीची ओळख निर्माण झालेली होती़ या अपघातांना आळा बसावा यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका व पोलीस प्रशासनाकडे गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती़ दोन दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्याच्या सहकार्याने गतिरोधक टाकण्याचे काम करण्यात आले होते. या गतिरोधकामुळे अपघातांना निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास नागरिकांमध्ये होता़ मात्र, या गतिरोधकावर महापालिका प्रशासनाची वक्रदृष्टी पडली अन् अवघ्या दोन तासांतच चौफुलीवर टाकलेले गतिरोधक महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले.
महापालिकेने दोन तासांपूर्वी टाकलेले गतिरोधक काढल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी मनपाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर महापालिकेचा जाहीर निषेध नोंदविला़ अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून गतिरोधक बसविण्याची कार्यवाही केली जाते तर मनपा तेच गतिरोधक उखडून टाकण्याचे काम करीत असल्याने पोलीस व मनपा महापालिका यांच्यातील वादामुळे गतिरोधक बसविण्याच्या कामाला सध्या तरी ब्रेक लागला आहे.
महापौरांचा जाण्या-येण्याचा रस्ता
नाशिक शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजनाताई भानसी या दररोज याच रस्त्याने ये-जा करतात़ या ठिकाणी होणाºया अपघातांचीही त्यांना जाणीव आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावर क़ का़ वाघ महाविद्यालया जवळ टाकलेल्या गतिरोधकांमुळे अपघातांना आळा बसला आहे़ त्याप्रमाणे तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक टाकल्यास अपघातांना नक्कीच आळा बसेल़ त्यामुळे महापौरांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती नागरिकांनी केली आहे़