रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:57 PM2021-07-21T23:57:26+5:302021-07-22T01:16:28+5:30
जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे.
जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे. सध्या ते येवला तालुक्यातील कानडी येथे नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून एक महिन्यापासून आपला संकल्प पूर्ण करत आहेत.
दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शेलार, दिंडी मालक नारायण महाराज काळे, सुभाष महाराज बोराडे, वसंत महाराज शेळके, विष्णू महाराज लंके, अगस्ती महाराज, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष शंतनू महाराज पवार, जनार्दन महाराज शेळके यांच्याकडे रेंढे यांनी एकाच जागी बसून हरिनाम जप करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र वयाचा विचार करता असे न करण्याचा सल्ला सर्वांनी दिला, मात्र रेंढे त्यावर ठाम राहिल्याने त्यांना कानडी येथील नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून देण्यात आला.
पिंपळगाव लेप पंचकमिटी भजनी मंडळ पिंपळगाव लेप व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात विणापूजन संतपूजन करून पिंपळगाव लेप ते कानडीपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन करत दिंडी काढली. तंबूला भगव्या पताकांनी सजवत कानडी ग्रामस्थांनी एकनाथ महाराज रेंढे यांच्याकडे वीणा सोपवली. गेल्या एक महिन्यापासून रेंढे महाराज यांचे विणावादन अखंडपणे सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या नियमाप्रमाणे तंबूत राहात हरिनामाचा जप, पहाटेची काकड आरती कानडी ग्रामस्थांच्या सहकार्याने नियमितपणे सुरू असून, येत्या १० ऑगस्टपर्यंत जप चालणार आहे.
बालपणापासून म्हणजे सुमारे ४५ वर्षांपासून मी विणेकरी म्हणून दरवर्षी अखंडपणे पालखी सोहळ्यात जात असतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्याची परंपरा खंडित झाल्याने मी एकाच ठिकाणी बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प केला आहे. पुढील वर्षी तरी दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू होऊन विठुरायाच्या दर्शनाला जाता यावे असे मागणं परमेश्वर चरणी घातले आहे.
- एकनाथ महाराज रेंढे, विणेकरी, पिंपळगाव लेप