अक्षय प्रकाश योजनेची मागणी
By Admin | Published: March 9, 2017 01:13 AM2017-03-09T01:13:27+5:302017-03-09T01:13:38+5:30
येवला : पाटोदा उपकेंद्रावरील विजेचा भार कमी होऊन शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज मिळावी, या हेतूने विखरणी उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली.
येवला : पाटोदा उपकेंद्रावरील विजेचा भार कमी होऊन शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज मिळावी, या हेतूने विखरणी उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. आजमितीस विखरणी उपकेंद्राची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. या उपकेंद्रात त्वरित अक्षय प्रकाश योजना सुरु करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अभियंता कोळी यांना देण्यात आले.
याबाबत विखरणी उपकेंद्रांतर्गत विखरणी, कानडी, आडगाव रेपाळ, विसापूर, कातरणी व मुरमी ही गावे येतात. या गावांना यापूर्वी पाटोदा उपकेंद्रातून अक्षय प्रकाश योजना सुरु होती. मात्र, विखरणी उपकेंद्र सुरु झाल्याने अक्षय प्रकाश योजना बंद झाली. विखरणी उपकेंद्राची निर्मिती झाल्यानंतर अक्षय प्रकाश योजना विरहित असल्याचे लक्षात आले. मोहन शेलार, अशोक बंदरे, नामदेव पगार व परिसरातील ग्रामस्थांनी अक्षय प्रकाश योजनेशिवाय उपकेंद्र सुरू करू नये यासाठी २० नोव्हेंबर २०१६ रोजी आमरण उपोषण केले होते. त्यावेळेस अधिकारी वर्गाने लेखी पत्र देऊन लवकरच अक्षय प्रकाश योजना सुरू करण्यात येईल. उपोषण सोडावे, अशी विनंती केली. लेखी पत्राने आश्वासन मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. मात्र चार महिन्यचिंा कालावधी उलटूनही या योजनेसंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिसरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी वीज वितरण कार्यालयात चौकशीसाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अक्षय प्रकाश योजना तत्काळ सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन
शेलार व जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, रविराज जाधव, नामदेव पगार, नारायण गुंजाळ, विलास ढोमसे, संदीप कदम, योगेश जांभळे, भरत पूरकर, दत्तू सैद आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)