परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य
By admin | Published: September 19, 2015 10:11 PM2015-09-19T22:11:24+5:302015-09-19T22:12:17+5:30
सरदवाडी धरण ओव्हरफ्लो : देवनदी प्रवाहित झाली; भोजापूर धरणातही पाण्याची आवक
सिन्नर : तालुक्यात गेल्या ४८ तासांत चांगला पाऊस झाला असून, शनिवारी पावसाने उघडीप दिली. सिन्नर मंडळात गेल्या ४८ तासांत १४० मिमी पावसाची नोंद झाली. शहराजवळील सरदवाडी धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले. पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने पूर्व भागासाठी वरदान ठरणारी देवनदी प्रवाहित झाली असून, त्यावरील छोटे-मोठे बंधारे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरिपाचे उत्पादन गेले असले तरी रब्बीच्या हंगामात काही पदरी पडेल या आशेने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. सिन्नर मंडळात चांगला पाऊस झाला. गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अशा दोन दिवसात सिन्नर शहरात १४० मिमी पाऊस झाला. शुक्रवारी सिन्नर मंडळात ५२ मिमी, पांढुर्लीत ५७ मिमी, डुबेरेत ४७.५, देवपूर मंडळात ७०.३, वावी मंडळात ४५.४, शहा व नांदूर मंडळात प्रत्येक ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाने उघडीप घेतली.
देवनदी प्रवाहित
कोनांबे धरण भरल्यानंतर अवर्षणग्रस्त पूर्वभागात वाहणारी देवनदी दोन दिवस झालेल्या पावसामुळे चांगलीच प्रवाहित झाल्याचे चित्र आहे. शनिवारी दुपारपर्यंत देवनदीचे पाणी दातली बंधाऱ्यांपर्यंत पोहचले होते. पश्चिम भागात अजून एक-दोन दिवस पाऊस झाल्यास सदर पाणी वडांगळीपर्यंत पोहचू शकेल. पूर्वभागासाठी देवनदी वरदान ठरते. या नदीला पाणी आल्यानंतर बंधारे भरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो. त्यामुळे पश्चिम भागात अजून दोन-तीन दिवस पाऊस सुरू राहावा, अशी प्रार्थना पूर्वभागातील शेतकऱ्यांकडून गणरायाला गेली जात आहे.
कुंदेवाडीत बंधाऱ्याचे पूजन
कुंदेवाडी येथे देवनदीवर नव्याने बांधण्यात आलेला टाकरखाणी बंधारा भरून ओसंडून वाहू लागला. कुंदेवाडी येथे ग्रामपंचायतमध्ये असलेल्या परस्परविरोधी गटाकडून देवनदीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. सत्ताधारी गटाच्या सरपंच सविता पोटे यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच गोविंद जाधव, नामकर्ण आवारे, स्टाइसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे, सुदाम पालवे, महिपत माळी, मधुकर गोळेसर, गंगाधर माळी, रंगनाथ गोळेसर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दुसऱ्या एका कार्यक्रमात माजी सरपंच ललिता माळी व मंगल कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भोजापूर धरणात आवक
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ठाणगावजवळील उंबरदरी धरणही ओसंडून वाहू लागल्याने म्हाळुंगी नदीला पूर आल्याचे चित्र शुक्रवारी सायंकाळी होते.
म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असल्याने भोजापूर धरणात पाण्याची बऱ्यापैकी आवक होऊ लागली आहे. तालुक्यातील भोजापूर धरण सर्वात मोठे असून, त्यातून मनेगावसह
१६ गाव व कणकोरीसह पाच
गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. धरणात
पाण्याची आवक होत असल्याने या योजनांना त्याचा फायदा होणार
आहे. (वार्ताहर)