नूतनीकरण झाले, वाद कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:57 AM2019-08-22T00:57:54+5:302019-08-22T00:58:11+5:30
शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.
नाशिक : शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी आरेखन झाले आणि निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सुमारे सहा महिने कलामंदिर बंद होते, त्यानंतर ते सुरू झाले. त्यातील रंगसंगती आणि सुविधा बघून सारेच भारावले, परंतु नंतर मात्र अनेक समस्या जाणवू लागल्या. हायटेक ध्वनी यंत्रणेचे महापालिकेला संचलन होईना. नूतनीकरण म्हणजे जणू नवी इमारत बांधली अशा थाटात नवा गडी नवा राज सुरू झाले आणि महापालिकेने त्यासाठीच नियमावलीच बदलली आहे. कामकाज सुलभ असेल तर कोणत्याही वास्तुला प्रतिसाद मिळतो, परंतु असे प्रत्यक्षात झालेले नाही. तांत्रिक सुविधांची हाताळणी, प्रत्येक सेवा सशुल्क या बरोबरच भाडेवाढीचा विषय गेल्या वर्षभर गाजला अन् त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी नाट्य व्यावसायिक आणि कलावंत मात्र समाधानी नाहीत. त्यामुळे गेल्याच महिन्यात या साऱ्यांनी पुन्हा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली.
वास्तविक अनेक गोष्टी लहानसहान आहेत त्याचे निराकरण झाले तरी कलावंतांची नाराजी दूर होऊ शकेल, परंतु जे नियमात आहे त्या पलीकडे जाऊन व्यावसायिकांची अपेक्षा असल्याचे यापूर्वीही तत्कालीन अधिकाºयांचे मत होते. तर कलावंतांवर अन्याय म्हणजे कला आणि संस्कृतीवर अन्याय अशाप्रकारची भावना कलाकार व्यक्त करीत आहेत. त्यातच नूतनीकरण केल्यानंतर ज्या प्रमाणात उत्पन्न हवे होते, त्या तुलनेत ते मिळाले नाही. उलट वीस लाखांंनी उत्पन्न घटले आहेत. आयुक्तांनी याबाबत संबंधित अधिकाºयांकडे जाब विचारला असला तरी त्याचे उत्तर देण्यासाठी कालिदास कलामंदिराकडे पूर्ण व्यवस्थापक आहेच तरी कोठे?
कालिदासचे नूतनीकरण झाले आणि स्मार्ट कालिदास म्हणजे उद्दिष्टपूर्ती झाली अशाच भावनेतून चालेल काय, तसे होत नसल्याचेच आज पुन्हा एकदा कालिदासच्या प्रश्नांवर नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना गमे यांची भेट घ्यावी लागली. एकंदरच नूतनीकरण झाले, परंतु त्यातून कलावंतांचे खच्चीकरण होते की काय अशी शंका आहे.