खडकमाळेगाव येथे विकासकामांचे लोकार्पण
By admin | Published: August 18, 2014 11:24 PM2014-08-18T23:24:32+5:302014-08-19T01:22:43+5:30
खडकमाळेगाव येथे विकासकामांचे लोकार्पण
निफाड : निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव-खातगाव (नजीक) येथील विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन झाले.खडकमाळेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेचे संस्थेच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, अंदाजे कोटी रुपये खर्चाचे सावरगाव-खडकमाळेगाव धरणाचे भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत खामगाव नजीक येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व खानगाव (नजीक) येथील ३३ के .व्ही. विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप बनकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव शिंदे, लासलगाव कृउबाचे माजी सभापती जयदत्त होळकर, जि. प. सदस्य सुरेखा गोधडे, माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब भवर, साधना जाधव, खडकमाळेगाव सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब रायते, उपाध्यक्ष भाऊसाहेब रायते, मौनगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष पोपट रायते, शिवाजी राजोळे गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी भुजबळ म्हणाले की, सध्याच्या केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कांद्याचे दर घसरले. कांद्याचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने सदर भाव कमी कसे करता येतात यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यामुळेच कांद्याचे भाव घसरले. भुजबळ पुढे म्हणाले की, सावरगाव-खडकमाळेगाव या १२ कोटी खर्चाचे धरणाचे काम हे ८ ते १० वर्षांपासून अडकले होते त्यात प्रंचड अडथळे होते. मी जातीने लक्ष घातल्यानेच या धरणाचे काम मंजूर झाले. मांजरपाडा धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी या धरणात सोडण्यात येईल.प्रास्ताविक दत्ता रायते यांनी केले. दिलीप बनकर, विलास देवरे, पोपट रायते यांची भाषणे झाली. सावरगाव-खडकमाळेगाव धरण व्हावे म्हणून गेली ८-१० वर्षे सरकार दरबारी सचोटीने प्रयत्न करणारे दत्ता रायते व त्यांच्या सहकाऱ्यांचा याप्रसंगी सावरगावच्या ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला़ दरम्यान गत विधानसभेला माणिकराव शिंदे माझ्या विरोधात उभे होते. त्यावेळेस त्यांना जी मते पडली ती मते आता मला या विधानसभेला टाका, बरोबर आहे की नाही, असे भुजबळ यांनी माणिकराव शिंदे यांच्याकडे पाहत म्हटले तेव्हा शिंदे यांनी हसत होकार दिला. तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट अन् हशाही. लोकसभा निवडणुकीत ‘आता करा यांना यावेळेस पलटी’ असा प्रचार विरोधी पक्षांनी केला.