एका दिवसाचे ५७ हजार रुपये ठरले होते बंगल्यांचे भाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 02:04 AM2021-07-01T02:04:11+5:302021-07-01T02:04:40+5:30
इगतपुरीमधील स्काय ताज व स्काय लगून व्हिला हे दोन आलिशान बंगले बॉलिवूडशी संबंधित व्यक्तींना बंगलामालक संशयित रणवीर सोनी यांनी दोन दिवसांकरिता भाडेतत्त्वावर दिले होते. एका दिवसासाठी सुमारे ५७ हजार रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दोन दिवसांसाठी संबंधितांकडून त्यांना १ लाख १४ हजार रुपये मोजले जाणार होते
नाशिक : इगतपुरीमधील स्काय ताज व स्काय लगून व्हिला हे दोन आलिशान बंगले बॉलिवूडशी संबंधित व्यक्तींना बंगलामालक संशयित रणवीर सोनी यांनी दोन दिवसांकरिता भाडेतत्त्वावर दिले होते. एका दिवसासाठी सुमारे ५७ हजार रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दोन दिवसांसाठी संबंधितांकडून त्यांना १ लाख १४ हजार रुपये मोजले जाणार होते. मुंबईस्थित व्यावसायिक संशयित पीयूष शेठिया यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी येथील या दोन बंगल्यांवर शुक्रवारपासून सलग दोन ते तीन दिवसांकरिता रेव्ह पार्टी रंगविण्यात आली होती. ‘हवाईयन थीम’वरील या पार्टीत बॉलिवूडशी संबंधित संशयित अभिनेत्री हिना पांचालसह कोरिओग्राफर, कॅमेरामन, मेकअपमॅन, अशा सुमारे १२ महिला आणि १० पुरुष मद्यपानासह हुक्का, गांजा, चरस, कोकेनसारख्या अमली मादक पदार्थांचे सेवन करताना पोलिसांच्या छाप्यात रंगेहाथ शनिवारी (दि.२६) मध्यरात्री पकडले गेले.
इगतपुरी येथे निसर्गरम्य अल्हाददायक वातावरणात सोनी यांचे एक दोन नव्हे, तर अर्धा डझन आलिशान बंगले आहेत. त्यांची ही वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या बंगल्यातून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस, दारूबंदी, कोटपा यासारख्या कायद्याच्या विविध कलमान्वये इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. या रेव्ह पार्टीप्रकरणी संशयित गुन्हेगारांची संख्या ३० वर पोहोचली आहे. दरम्यान, व्यावसायिक असलेले बंगलामालक सोनी यांना पोलिसांनी या गुन्ह्यात मुंबई येथील उच्चभ्रू वसाहतीमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी पोलिसांनी इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.