रेणूका चौधरी यांच्या कास्टींग काऊचच्या आरोपाने संसदेचा अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:42 PM2018-04-25T14:42:34+5:302018-04-25T14:42:34+5:30
नाशिक- कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी संसदेतही कास्टींग काऊच होत असल्याचा केलेला आरोप म्हणजे देशाच्या सर्वाेच्च सभागृह असलेल्या संसदेचा अवमान आहे.अशाप्रकारची कास्टींग काऊच संस्कृती कॉँग्रेसची असेल शिवसेनेत मात्र महिला सुरक्षीत असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नाशिक- कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी संसदेतही कास्टींग काऊच होत असल्याचा केलेला आरोप म्हणजे देशाच्या सर्वाेच्च सभागृह असलेल्या संसदेचा अवमान आहे.अशाप्रकारची कास्टींग काऊच संस्कृती कॉँग्रेसची असेल शिवसेनेत मात्र महिला सुरक्षीत असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याशिवाय नाणार प्रकल्पाच्या विरोधात कोकणवासीय ठाम असून प्रसंगी छातीवरती गोळ्या झेलतील असा इशारा देत त्यांनी लोकांचा विरोध लक्षात घेऊन प्रकल्प पुढे न रेटण्याचे शहाणपण सरकारने दाखवावे असेही ते म्हणाले.
शिवसनेच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेल्या खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांच्या कास्टींग काऊच आरोपावर टीका केली. रेणूका चौधरी इतके वर्षे सत्तेत होत्या. पदावर असताना त्यांनी यावर आवाज का उठवला नाही आता निवृत्त झाल्यानंतर बोलून काय उपयोग असा प्रश्न करीत ते म्हणाले की अशाप्रकारची संस्कृती कॉँग्रेसच असू शकते. परंतु या आरोपामुळे संसदेतील पुरूष आणि महिला खासदार यांचा आणि त्याचबरोबर सभागृहाचा अवमान झाला आहे.
नाणार प्रकल्पाविषयी बोलताना त्यांनी शिवसेनेने कोकणवासियांचा विरोध दर्शवून दिला आहे. कोकणवासीय अत्यंत लढवय्ये असतात. संयुक्त महाराष्टÑासाठी गोळ्या झेलणारे कोकणवासीय आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध लक्षात घेतलाच पाहिजे. हा प्रकल्प लादणार नाही असे जर सरकार म्हणत असेल तर विरोध लक्षात घेऊन प्रकल्प न साकारण्याचे एक शहाणपण सरकारने बाळगले पाहिजे. सरकार कॉँग्रेसचे असो अथवा सध्याचे परंतु त्यांच्याकडे अशाप्रकारचे शहाणपण कायम असते. ते दिसले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
आसाराम बापु दोषी, स्वामी चिन्मयानंदांचे काय?
आसारामबापु यांना बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले. परंतु दुपारपर्यंत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आले नसल्याने खासदार राऊत यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, दुसरीकडे उत्तर प्रदेशात स्वामी चिन्मयानंदजी यांच्यावरील बलात्काराचा खटला राज्य सरकारने मागे घेतला, हे संशयास्पद असून त्याची माहिती घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
उध्दव ठाकरे घेणार आढावा बैठक
येत्या ६ मेस शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसंदर्भात उत्तर महाराष्टÑाची आढावा बैठक होणार आहे. त्यासंदर्भात राऊत यांनी पदाधिकाºयांशी चर्चा केली.