दिव्यांगांना दाखले देण्यासाठी चार रुग्णालयांचे फेरनियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:39 AM2020-01-15T01:39:27+5:302020-01-15T01:40:46+5:30
जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी उडणारी झुंबड आणि दिव्यांगांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. तसेच या दाखल्यांसाठी आठवडाभरातील दिवसांचेदेखील फेरनियोजन करण्यात आले आहे.
नाशिक : जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी उडणारी झुंबड आणि दिव्यांगांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. तसेच या दाखल्यांसाठी आठवडाभरातील दिवसांचेदेखील फेरनियोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग दाखल्यांसाठी जिल्हा रुग्णालयात वर्षभर गर्दी दिसून येते. त्यामुळे दाखले वितरणात अनेकदा गोंधळ उडण्याचे, डॉक्टर उशिरा येण्याने तिष्ठत रहावे लागण्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. दाखले वाटपातील या त्रुटींवर दिव्यांगबांधव तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून अनेकदा रोष व्यक्त होण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. शहरातील मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींसाठी जेडीसी बिटको व डॉ. झाकीर हुसेन रु ग्णालयात प्रमाणपत्र वितरित करण्याची सुविधा उपलब्ध असतानाही शहरातील दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालयात गर्दी करीत होते. संपूर्ण जिल्ह्णातील दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालयात येत असल्याने जिल्हा रुग्णालयावर दाखले वितरणाचा अतिरिक्त ताण येत होता. ही बाब ओळखून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्रमाणपत्र वितरणात सुलभता यावी, यासाठी तालुकानिहाय रुग्णालयांचे फेरनियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींच्या दाखल्यांसाठी कमी काळ ताटकळण्याची वेळ येणार असून, काही प्रमाणात तरी लवकर दाखले उपलब्ध होऊ शकणार आहेत.