वृक्षप्राधिकरण समितीची पुनर्रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:26 AM2019-08-31T01:26:23+5:302019-08-31T01:26:41+5:30
वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे.
नाशिक : वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. आणखी काही नगरसेवक आणि अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेच्या वतीने वृक्षप्राधिकरण समितीची यापूर्वीची रचना गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने रद्द केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार बीएस्सी झालेलेच नगरसेवक हवेत, असे कारण देऊन महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांत केवळ शिवसेनेचे चंद्रकांत खाडे आणि भाजपाच्या वर्षा भालेराव याच बीएस्सी झालेल्या असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर अशासकीय सदस्य म्हणून पुंडलिक गिते यांची निवड करण्यात आली. दरम्यान, मनसेचे संदीप भंवर यांनी उच्च न्यायलयात दाखल याचिकेच्या वेळी समितीची सदस्य संख्या पूर्ण नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अन्य सदस्य नियुक्तीचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले.
या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आयुक्त असतात, तर समितीत पंधरा सदस्य नियुक्त करता येतात त्यात अशासकीय सदस्यांपेक्षा नगरसेवकांची संख्या किमान एकाने जास्त असावीत अशी तरतूद आहे. समितीत यापूर्वी आयुक्त दोन नगरसेवक आणि दोन अशासकीय सदस्य नियुक्त असल्याने यासंदर्भात महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महासनेने आणखी चार सदस्यांची नियुक्ती केली आहे यात भाजपाचे अजिंक्य साने, नीलेश ठाकरे, संगीता गायकवाड, तर शिवसेनेच्या श्याम कुमार साबळे यांचा समावेश आहे.
आणखी सदस्य नियुक्त करणार
वृक्षप्राधिकरण समितीत आता आयुक्तांबरोबरच सहा नगरसेवक आणि दोन अशासकीय असे आठ सदस्य नियुक्तझाले आहेत. लवकरच समितीत आणखी सात सदस्य नियुक्तकरण्यात येणार असून, त्यात नगरसेवकांचा प्रामुख्याने समावेश केला जाणार आहे.