ढासळलेले वाडे दुरुस्तीस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:45 AM2019-08-21T01:45:21+5:302019-08-21T01:45:43+5:30
एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे.
नाशिक : एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे. दरम्यान, शहरातील नाले विकासकांनी गीळंकृत करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. परंतु शहरात अवघे तीन नैसर्गिक नालेच मूळ प्रवाहात वाहत असल्याचा धक्कादायक प्रकारदेखील उघडकीस आला. यामुळे पुढील महासभेत यासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेची महासभा मंगळवारी (दि.२०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरात ४ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे तसेच गंगापूर धरणातील विसर्गामुळे आलेल्या महापुरावर सुमारे तीन ते चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर महापौरांनी गावठाणासाठी क्लस्टर (समुच्चय) विकास योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच पाठविण्यात आला असून, तो तातडीने मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करण्याची आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.
शहरात एकीकडे गावठाणातील वाडे धोकादायक असून तेथे राहणे धोकादायक असल्याच्या नोटिसा महपाालिका बजावते तर दुसरीकडे वाडे दुरुस्त करण्यासाठी वाडेमालक अथवा भाडेकरू गेले की पूररेषेत बांधकाम करता येत नाही असे सांगून दुरुस्तीदेखील करण्यास परवानगी नाकारली जाते. त्यामुळे महापालिकाच दुहेरी कोंडी करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
शहरातील नाले डीपीमधून गायब
शहरातील नगर नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक असलेले नाले दिवसेंदिवस गायब होत आहेत. २०१७ मध्ये महापालिकेचा शहर विकास आराखडा मंजूर झाला त्यात तर नालेच दर्शविण्यात आलेले नाही, अशी गंभीर बाब यावेळी संभाजी मोरुस्कर यांनी उघड केली. शहरात आलेल्या महापुरास अनेक गोष्टी कारणीभूत असून मूलत: नैसर्गिक नाले बंद झाल्यानेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप डॉ. हेमलता पाटील यांनी केला. शहरात वीस नाले होते त्यापैकी आता केवळ तीन नाले अस्तित्वात शिल्लक आहेत. नाल्यांवर अतिक्रमण झाले असून, ते कसे कोणी केले याबाबत पुढील महासभेत अहवाल सादर झाला पाहिजे. अन्यथा यापूर्वी आपण अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले होते आता मात्र महासभेत हार आणून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले.
महासभा गुंडाळली
नाशिकरोड येथील रिपाइंचे माजी नगरसेवक सुनील वाघ यांचे निधन झाल्याने महासभेचे कामकाज आवरते घेण्यात आले. कामकाज तहकूब करावे, अशी मागणी गजानन शेलार यांनी केली. परंतु ती मान्य होत नसल्याचे बघून शिवसेनेचे नगरसेवकाही आक्रमक झाले. यामुळे धोरणात्मक विषय वगळता अन्य सर्व नागरी कामांना मंजुरी देण्यात आली.