नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार
By श्याम बागुल | Published: August 11, 2023 04:39 PM2023-08-11T16:39:54+5:302023-08-11T16:41:34+5:30
वाहतुकीचा वाचणार वेळ
श्याम बागुल, नाशिक: पावसाळ्यात मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला नाशिक ते मुंबईदरम्यान जागोजागी पडलेले खड्डे व त्यातून वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेता या महामार्गाच्या दुरुस्तीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक- मुंबई रस्त्याची डागडुजी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण महामार्ग खड्डेमुक्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
नाशिक- मुंबई रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. एवढेच नव्हे तर त्याचा फटका आमदार, खासदार, मंत्र्यांनाही वारंवार बसला. या विषयावर थेट पावसाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी चर्चा घडवून आणली होती. तर अलीकडेच नाशिकच्या उद्योजकांनी खड्ड्यांनी त्रस्त होत टोल न भरण्याची भूमिका घेतली हाेती. साडेतीन-चार तासाच्या अंतरावर असलेल्या मुंबईत पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत असल्याने ते टाळण्यासाठी अनेकांनी रेल्वेला पसंती दिली. मंत्री छगन भुजबळ यांनी तर रेल्वेनेच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांवर तातडीचा तोडगा काढण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांनी केली होती. यानुसार गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजीचे काम हाती घेतले होते.