सटाण्यात साकारल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती
By admin | Published: October 30, 2014 10:21 PM2014-10-30T22:21:43+5:302014-10-30T22:21:58+5:30
इतिहासाची ओळख : नागरिकांचा प्रतिसाद
सटाणा : नव्या पिढीला गड-किल्ल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने सटाणा शहरातील स्वयंभू संकुलानजीक शिवकालीन गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सदर प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
शिवकालीन इतिहास जतन करण्यासाठी येथील शिवप्रेमी मित्रमंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये शिवकालीन गडकिल्ल्याच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून, या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवकाळातील प्रतापगड, सिंहगड, राजगड, रायगड, साल्हेर, मुल्हेर किल्ले, पुरंदरचा किल्ला आदिंसह लहान-मोठ्या किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा दुर्ग महामंडळ उभारण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे. शिवकालीन ऐतिहासिक स्थळांवर पर्यटक व गिर्यारोहकांसाठी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केल्यास मराठी माती व संस्कृतीचा संस्कार रुजविण्यास निश्चितच मदत होईल.
शिवछत्रपतींबद्दल जनमाणसात अढळ स्थान आहे. परंतु व्यापक दृष्टिकोनातून शिवचरित्र असण्याबाबत सामाजिक पातळीवर उदासीनता असल्याचे निदर्शनास आले आहे.
सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, बालक, युवक आदि समाजातील सर्व घटकांनी ठिकठिकाणी शिवकालीन गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारणे शक्य आहे. अन्य उत्सवांप्रमाणे या उपक्रमांसाठी लोकवर्गणीची आवश्यकता नसून, दगड-माती व कल्पकतेच्या बळावर गडाची उभारणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)