तीन दिवसांत पाण्डेय सोपविणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:36+5:302021-06-16T04:20:36+5:30
आरटीओमधील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराबाबत शहर पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी चौकशीचे आदेश दिले होते. ...
आरटीओमधील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराबाबत शहर पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पंधरवड्याच्या कालावधीनंतर चौकशी सत्र शनिवारी (दि. १२) समाप्त झाले. याप्रकरणी गुन्हे शाखेने पाण्डेय यांच्याकडे त्यांचा चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालाची बारकाईने पडताळणी व अभ्यास केला जात आहे. येत्या तीन ते चार दिवसांनंतर याबाबत अंतिम अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
या तक्रारीमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते थेट राज्याचे परिवहन आयुक्त, सहआयुक्तांसह विविध जिल्ह्यांच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांपर्यंत विविध कारणाने भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पाण्डेय यांनी शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखेतर्फे २७ मेपासून चौकशीला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, मंत्रालयातील सचिव, उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून आरटीओमधील राज्यपातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून थेट जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत तसेच खासगी व्यक्ती अशा सुमारे ३५ पेक्षा अधिक लोकांची याप्रकरणी चौकशी शहर गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा भला मोठा चौकशी अहवाल गुन्हे शाखेने पाण्डेय यांच्याकडे सादर केला आहे.