रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाला अहवाल
By admin | Published: June 30, 2015 11:37 PM2015-06-30T23:37:23+5:302015-06-30T23:44:39+5:30
रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाला अहवाल
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनेक वैद्यकीय अधिकारी कागदावर हजर दिसत असले तरी, अनेक वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षात गैरहजर आहेत. या रिक्त जागांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, असा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला. हा ठराव तत्काळ शासनास पाठविण्याच्या सूचना शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. बैठकीत सभापती किरण थोरे यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला. त्यात सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, १३ तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच १४ वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे कार्यरत दिसत असली तरी त्यातील वैद्यकीय अधिकारी शिक्षणासाठी व इतर कारणांसाठी रजेवर गेलेले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त दिसत आहेत. त्यामुळे ही पदे तत्काळ भरण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. तसेच हा ठराव तत्काळ शासनास पाठविण्याबाबत आरोग्य विभागाने कार्यवाही करण्याचे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. बैठकीस सदस्य शरद माळी, ज्योती तलवारे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)