अहवाल निगेटिव्ह: कोरोनाग्रस्त इराणमधून आलेल्या युवकावर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:10 PM2020-03-03T17:10:33+5:302020-03-03T17:12:32+5:30
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याच्या स्त्रावच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे चिंतेचे कारण नाही
नाशिक : कोरोनाग्रस्त देश इराणमध्ये नोकरीस असलेला मुळचा लेखानगर सिडको भागातील एका व्यक्तीला सर्दी, थकव्याचा त्रास अचानकपणे जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रूग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या नमुन्यांच्या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाला आहे. यामुळे नाशिककरांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वैद्यकिय सुत्रांकडून करण्यात आले आहे.
दोन दिवसांपुर्वी इटलीमधून मुळ चंद्रपूरचा असलेला मात्र आपल्या बहिणीकडे नाशकात भेटण्यसाठी आलेल्या अशाच एका कोरोनाग्रस्त देशातील रुग्ण जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाला होता. त्याच्याही घशातील स्त्रावचे नमुने घेऊन पुण्यात प्रयोगशाळेला पाठविले गेले होते. या रुग्णाचाही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन दिवसानंतर पुन्हा इराणसारख्या कोरोनाग्रस्त देशातून मुळचा नाशिकचा असलेला रुग्ण शहरात आल्याने त्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे तत्काळ त्याला सोमवारी (दि.२) जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास उद्भवला होता. साधारणत:तीशीचा हा तरूण २५ फेब्रुवारी रोजी नाशकात त्याच्या निवासस्थानी आला होता. त्याच्यासोबत त्याचे अन्य दोन मित्रदेखील नाशकात वेगवेगळ्या परिसरात राहत्या घरी आले होते. या तीघांची स्क्रिनिंग मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्यापैकी एका रूग्णाला सर्दी, खोकल्याचा त्रास सोमवारपासून उद्भवल्याने त्यास खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याच्या स्त्रावच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे चिंतेचे कारण नाही, मात्र नागरिकांनी सर्दी,खोकला, थकवा, ताप यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.