शहरातील दोन रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:00 AM2020-04-27T00:00:33+5:302020-04-27T00:01:13+5:30
लॉकडाउनच्या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतानाच रविवारी नाशिक महानगरातील २ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मालेगावमधील तीन रुग्णं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील ३७ संशयितांचा अहवालदेखील निगेटिव्ह आला आहे.
नाशिक : लॉकडाउनच्या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतानाच रविवारी नाशिक महानगरातील २ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मालेगावमधील तीन रुग्णं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील ३७ संशयितांचा अहवालदेखील निगेटिव्ह आला आहे.
नाशिक शहरातील २ पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा प्रशासनाला नाशिक शहराच्या बाबतीत खूप मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक शहरातून यापूर्वीच गोविंदनगरचा एका बाधित रुग्णाला गत आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, तर यापूर्वी जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रुग्णालादेखील सर्वप्रथम घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर रविवारी मालेगावच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील एक आणि जिल्ह्यातील चार रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात सोमवारी या दोन कोरोनामुक्तरुग्णांचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील तीन, तर जिल्ह्यातील चार याप्रमाणे कोरोनामुक्त आणि घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा ७वर पोहोचणार आहे. नाशिकमधील दोन्ही निगेटिव्ह रुग्णांना डिस्चार्जबाबतचा निर्णय सोमवारी त्यांचा एक्स-रे झाल्यानंतर घेण्यात येणार आहे. दरम्यान मालेगावमध्ये १२ रुग्ण कोरोनामुक्तहोण्याच्या मार्गावर असून, यांच्याबाबतही लवकरच पुढील अहवाल मिळण्याची शक्यता आहे.
रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यातील एकूण ३७ संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यात नाशिक शहरातील २७ रुग्णांचा निगेटिव्ह, तर मालेगावमधील १० रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रात्री
उशिरा आणखी काही अहवाल
प्राप्त होणार आहे.