कळवणला २०० खाटांच्या रुग्णालयाची शिफारस करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 12:03 AM2021-08-26T00:03:02+5:302021-08-26T00:03:37+5:30
कळवण : महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण तालुक्याचा दौरा करीत आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयालाही भेट देत २०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालय उभारणे कामी शासनस्तरावर आमदार नितीन पवार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची शिफारस राज्य सरकारला करणार असल्याचे समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले.

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, कामे, आश्रमशाळा, वसतिगृह, निधी संदर्भात आढावा घेत शासकीय आश्रमशाळा मोहनदरी येथे समितीने भेट देऊन पाहणी केली. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयास समितीने भेट देऊन रुग्णालयातील अपघात कक्षातील स्वच्छता , सुसज्ज अतिदक्षता कक्ष ,शस्त्रकिया गृह , प्रसूतिपश्चात सेवा विभागातील स्वच्छता व व्यवस्थेची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. समिती सदस्यांसमवेत अवर सचिव काकड ,प्रतिवेदक शिंदे, तहसीलदार बी. ए. कापसे ,सहाय्यक प्रकल्पाधिकारी पंकज बुरकुले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार , पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ , वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सुविधांची केली खातरजमा
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, नॉन कोविड विभागाची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस केली व आरोग्य सुविधा मिळतात की, नाही याची खातरजमा केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागात असलेल्या सुसज्ज रुग्णालयाबाबत समितीने समाधान व्यक्त करत तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. शिवाय अभिप्रायही नोंदवले.