कळवणला सव्वालाख क्विंटल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 10:50 PM2021-06-20T22:50:27+5:302021-06-21T00:42:29+5:30
कळवण : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडा, अभोणा व कनाशी उपआवारात गतसप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. देशांतर्गत ...
कळवण : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडा, अभोणा व कनाशी उपआवारात गतसप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. देशांतर्गत मागणी असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तूर्त तरी परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे. गत सप्ताहात १ लाख २१ हजार ३०० क्विंटल कांद्याची आवक होऊन प्रतिक्विंटलला सर्वाधिक २३५० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक रोज ९०० ते १००० ट्रॅक्टर इतकी राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच राहिली. कांद्याला मागणी असल्याने कांद्याचे दर किंचित वधारले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० ते ८०० रुपये, सरासरी १८०० ते २००० रुपये, तर सर्वाधिक २३५० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही कांद्याची आवक तशी जेमतेमच राहिली; पण मागणी टिकून होती. चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे कांदा आवक वाढत असल्याचे व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा दरातील चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हळूहळू आता देशासह विदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कांद्याची मागणी वाढत असल्याने कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या वर गेले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजार भाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.
देशांतर्गत कांद्याची मागणी असल्याने कांद्याच्या बाजार भावावर कोणताही परिणाम तूर्त तरी होणार नाही. देशासह विदेशात कोरोनामुळे कांद्याची मागणी घटल्याने निर्यातीवर परिणाम झाला. दरवर्षी साधारणत: ३५ ते ३७ हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात परदेशात होते. यंदा मात्र फक्त १२ हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात परदेशात झाली आहे. देशासह विदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कांद्याची मागणी वाढत आहे.
- हेमंत बोरसे, संचालक, कळवण बाजार समिती.