तीनशेहून अधिक रुग्णांचे अहवाल खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:53 PM2020-05-06T22:53:26+5:302020-05-07T00:02:57+5:30
नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे.
नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे. नाशिक शहरातील नमुन्यांंपेक्षा ग्रामीण भागातील नमुन्यांना प्राधान्याने जिल्हा शल्य चिकित्सक तपासणीसाठी पाठवतात. मात्र, त्यानंतर रखडलेले सुमारे तीनशे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेतून तपासणीसाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आरोग्य संचालकांची परवानगी घेतली. मात्र, त्यानंतर दोन दिवस झाले तरी शल्य चिकित्सकांनी हे नमुने पुण्याला पाठविलेच नाही. ही बाब कळताच मनपा आयुक्तांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना नोटीस बजावली आहे.
नाशिक शहरात कोरोनाबधितांची संख्या मर्यादित होती तोपर्यंत अडचण नव्हती. मात्र आता कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एक बाधित रग्ण आढळल्यानंतर त्याचे घर केंद्रस्थानी ठेवून पाचशे मीटर परिघाचे क्षेत्र सील केले जाते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथके नियुक्त करून घर सर्वेक्षण केले जाते. बाधिताच्या कुटुंबातील आणि त्याच्या अतिजोखमीच्या व कमी जोखमीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर संशयित रुग्णांच्या घसा स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. शहरात बाधितांची संख्या २१ तर झाली आहेच परंतु अगोदरच्या संशयित रुग्णांचे नमुनेच वेळेवर मिळत नसल्याने अडचण होत आहे. शहरात प्रयोगशाळा असतानाही प्रत्यक्षात पाच ते सात दिवस झाले तरी कोरोना तपासणी अहवाल मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
-----------
आता संशयित रुग्ण ठेवायला जागा नाही
महापालिकेने संशयित रुग्ण देखभालीसाठी तपोवन आणि अन्य
काही ठिकाणी ठेवले असले तरी आता मात्र, संबंधितांची संख्या वाढल्यास त्यांना क्वॉरंटाइन करण्यासाठी मनपाकडे जागाच नाही. त्यामुळे अनेकांना होम क्वॉरंटाइन करून ठेवले जात आहे. त्यातच
सध्या तपोवन किंवा नमुने घेतल्यानंतर अनेकांना त्यातील कोण बाधित आहे, हे कळत नसल्याने या विलंबातच एखाद्याला लागण होण्याची शक्यता आहे. ही खरी चिंता असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
--------------------
मनपा आयुक्तांची आरोग्य संचालकांशी चर्चा
जुने प्रलंबित नमुने आणि नवीन नमुने यात घोळ नको
म्हणून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट आरोग्य संचालकांशी थेट चर्चा केली. त्यांनी पुण्यातील प्रयोगशाळेत
एक दिवस फक्त महापालिकेचे नमुने तपासून देण्याचे मान्य केले आणि एक दिवस पूर्णत: अन्य कुठलेही नमुने घेतले नव्हते. परंतु जिल्हा शल्य चिकित्सकांनी दोन दिवस हे नमुनेच पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले नाही. अखेरीस आयुक्त गमे यांनी डॉ. जगदाळे यांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे.