सरपंच परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रतिनिधी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 06:45 PM2019-07-29T18:45:43+5:302019-07-29T18:46:07+5:30
नाशिक : राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी शिर्डीत होत असलेल्या सरपंच, उपसरपंच ...
नाशिक : राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी शिर्डीत होत असलेल्या सरपंच, उपसरपंच परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरपंच परिषदेबाबत सोमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी माहिती दिली. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प्रतिनिधी निवडावा, कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या सरपंचांसाठी स्वतंत्र कक्ष असावा आदी जवळपास २५ मागण्यांसाठी सरपंच परिषद काम करत आहे. या परिषदेस सरपंच, उपसरपंच यांच्यासह ३५१ पंचायत समितींचे सभापती व राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या सभापतींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सरपंच परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांना प्रवास भत्ताही मंजूर करण्यात आला आहे. परिषदेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्य संघटक अविनाश आव्हाड, जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे आदी उपस्थित होते.
चौकट===
ग्रामपंचायत निधीतून प्रवासखर्च
या परिषदेला येण्यासाठी सरपंच, उपसरपंच यांना ग्रामपंचायत स्वनिधीतून खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून २८१९ सरपंच, उपसरपंच या परिषदेसाठी उपस्थित राहणार असून, यासाठी ५६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिली.