चौघा नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 9, 2017 01:05 AM2017-02-09T01:05:58+5:302017-02-09T01:06:17+5:30
चौघा नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला
नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षांतरामुळे बदललेली राजकीय समीकरणे, उमेदवारी नाकारल्यामुळे निष्ठावंतांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील प्रभाग २४ मध्ये विद्यमान चार नगरसेवकांची प्रतिष्ठपणाला लागली असून, प्रभाग रचनेत झालेल्या बदलामुळे मतदार नेमके कोणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपा व कॉँग्रेस आघाडीने ताकद लावल्याने प्रभागात तिरंगी लढतीचे चित्र आहे.
प्रभाग २४ हा सध्याच्या प्रभाग क्रमांक ४१ व ४२ मिळून तयार झाला आहे. मळे विभाग तसेच गोविंदनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीचा यात समावेश असून, सद्यस्थितीत सेनेचे दोन व कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एकेक असे चार विद्यमान नगसेवक प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवसेना, भाजप परस्परविरोधी लढत असून, दोन्ही कॉँग्रेसने प्रभागात आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अ’ ओबीसी गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक कल्पना पांडे, कॉँग्रेसकडून नगरसेवक अश्विनी बोरस्ते, भाजपाकडून सुनंदा गिते यांच्यातच खरी लढत असून, मनसेने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे खरी लढत पांडे, बोरस्ते यांच्यातच होण्याची तूर्त चिन्हे आहेत. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावरच हे दोन्ही नगरसेवक निवडणुकीला सामोरे जात असून, भाजपाच्या गिते त्यांना कितपत आव्हान देतील त्यावरच कोणा एकाचे भवितव्य ठरणार आहे.
‘ब’ नागरिकांच्या मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेवक राजेंद्र महाले, भाजपाकडून जगन्नाथ पाटील, शिवसेनेकडून नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचे पुतणे कैलास चुंभळे व मनसेकडून योगीता जगताप या चौघांमध्ये लढत दिली असली तरी, खरी लढत महाले व चुंभळे यांच्यातच लढण्याची शक्यता आहे. महाले यांनी सलग दोन निवडणुकीत या प्रभागाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. कैलास चुंभळे प्रभागात नवखे असले तरी, शिवाजी चुंभळे यांच्यासाठी त्यांची उमेदवारी प्रतिष्ठेची आहे. भाजप मंडळ अध्यक्षपदाच्या माध्यमातून जगन्नाथ पाटील यांचा मतदारांशी संपर्क असला तरी, प्रभागात भाजपाच्या पॅनलमधील अन्य उमेदवार पाहता त्याचा कितपत उपयोग पाटील यांना होतो त्यावरच भवितव्य ठरणार आहे.
‘क’ सर्वसाधारण महिला गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक कल्पना चुंभळे, भाजपाकडून सुरेखा नेरकर, राष्ट्रवादीकडून अलका वझरे निवडणूक लढवित आहेत.२ कल्पना चुंभळे ह्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या असून, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रभागात चुंभळे यांचे असलेले प्रभुत्व पाहता त्यांच्या उमेदवारीला तसा धोका दिसत नसला तरी, भाजपाच्या नेरकर किती मते खातात त्यावरच चुंभळे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
‘ड’ सर्वसाधारण गटातून सेनेकडून पश्चिम विधानसभा मतदार संघ प्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे, भाजपाकडून माजी नगरसेवक अण्णा पाटील यांचे पुत्र राम पाटील, राष्ट्रवादीकडून आर्किटेक्ट विजय सानप यांनी अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. तर मनसेने संदीप दोंदे यांना पुरस्कृत केले आहे.
गेल्या निवडणुकीत तिदमे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती, अवघ्या ५५ मतांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे गत पराभवाचा वचपा काढण्याची त्यांना संधी असली तरी, आता प्रभागातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे ते कितपत शक्य होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
भाजपाकडून इच्छुक विजय सानप यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले तर अण्णा पाटील यांनीही कॉँग्रेससोडून भाजपाचे कमळ धरून राजकीय सोय करून घेतली आहे. त्यामुळे उमेदवारांचे पक्षांतर, विद्यमान नगरसेवकांनी केलेले कार्य पाहता, प्रभाग २४ मध्ये काट्याची लढत होणार हे स्पष्ट आहे.