उत्तर महाराष्ट्रामध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:23 AM2019-10-20T01:23:30+5:302019-10-20T01:24:20+5:30
राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.
नाशिक : राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व नगर या पाच जिल्ह्यांतील ४७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वाधिक प्रत्येकी २८ जागा भाजप व राष्ट्रवादीकडून लढविल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नगर जिल्ह्यात काँग्रेस १२ पैकी तीन जागांवर लढत आहे. याच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात होत असलेल्या आणि नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात छगन भुजबळ नांदगावमधील त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या लढतीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. नाशकात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले गेल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यंदा इगतपुरीतून शिवसेनेच्या, तर भरत गावित नवापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीस सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे, नाशिक पश्चिमची जागा युतीअंतर्गत शिवसेनेला न सुटल्याने भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात सेनेचे बंडखोर विलास शिंदे रिंगणात असून, शिंदे यांच्या समर्थनार्थ नाशकातील शिवसेनेच्या सुमारे ३५० पदाधिकाऱ्यांसह ३४ नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे राजीनामे पाठविल्याने सदर जागेवर मोठी चुरस दिसून येत आहे.
एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत राहिलेले खान्देशातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे यंदा तिकीट कापले जाऊन त्यांच्या कन्येस रिंगणात उतरविले गेले आहे.