राहुड पाटचारी दरेगावपर्यंत आणण्यासाठी निवेदन
By admin | Published: October 1, 2016 12:02 AM2016-10-01T00:02:11+5:302016-10-01T00:02:38+5:30
राहुड पाटचारी दरेगावपर्यंत आणण्यासाठी निवेदन
दरेगाव : राहुड-उसवाड पाटचारी पुढे कोकणखेडेपर्यंत प्रस्तावित असून, त्यापुढे सुमारे तीन किमी अंतरावर दरेगाव बारीपर्यंत नवीन चारी करून राहुड धरणाचे पूरपाणी चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्याकडे दरेगाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
चांदवड तालुक्यातील दरेगाव, निमोण, डोणगाव, शिंगवे, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव या गावांना सातत्याने दरवर्षी तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. शेतीला सोडाच पण पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील होते. या भागात सध्या पिण्याच्या पाण्याची योजना वगळता अन्य कोणतीही पाण्यासाठीची योजना उपलब्ध नाही. केवळ निसर्गाच्या भरवशावर राहून
येथील शेती व त्यावरील अर्थकारण चालते. रब्बी व उन्हाळी पिके तर या भागात पाण्याअभावी येत नाही. राहुड धरणातील जास्तीचे पूरपाणी सोडून परिसरातील छोटे तलाव, गावतळी, पाझर तलाव भरण्यास मदत होईल व राहुड-उसवाड पाटचारी कोकणखेडेपर्यंत येणार आहे. त्यापुढे दरेगाव येथील बारीपर्यंत तीन किमी अंतरावर पाटचारी खोदली.
दरेगाव बारीत पाणी आल्यानंतर पुढे कोणताही खर्च न करता हे पाणी परिसरातील सर्वच गावांना मिळणार असल्याने परिसराला नवसंजीवनी मिळेल. या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी आमदार डॉ. अहेर यांच्याकडे अमोल देवरे, विक्रम देवरे, रावसाहेब देवरे, दादाजी अहिरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)