खोट्या निवेदनांविरुद्ध घरकुल लाभार्थ्यांचे निवेदन
By admin | Published: March 9, 2016 10:51 PM2016-03-09T22:51:00+5:302016-03-09T22:55:46+5:30
पालिकेवर धडक : आठवडाभरात सर्वेक्षणाचे काम
नाशिक : महापालिकेकडे काही लोक खोटी निवेदने, माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करत मूळ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळू देण्यात अडथळे उत्पन्न करत असल्याची तक्रार करत संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवाजीवाडी, नंदिनीनगर आणि भारतनगरमधील रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली.
शिवाजीवाडी, नंदिनीनगर आणि भारतनगरमधील सुमारे १६८ लाभार्थ्यांची यादी मंजूर असतानाही काही लोक खोटी निवेदने, अर्जफाटे करून घरकुलांपासून वंचित ठेवत असल्याची तक्रार मांडत परिसरातील महिलांनी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली. नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या महिलांनी खोटी निवेदने देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, २०१३ मध्येच रहिवाशांनी आपली घरे स्वत:हून हटविली होती. त्यातील अनेक लाभार्थ्यांची रीतसर यादीही मंजूर झाली आहे; परंतु माहितीच्या अधिकारात अर्ज, निवेदने देऊन जाणूनबुजून काही लोक लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करताना अडथळे आणत आहेत. अनेकांना घरकुले देण्यात आली; परंतु त्यांनी अजूनही त्यांची जुनी घरे हटविलेली नाहीत. संबंधितांवरही फौजदारी कारवाई करावी. तर काही लोकांनी आपली घरकुले गहाण टाकलेली असल्याची तक्रारही संबंधित रहिवाशांनी केली. येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास मनपावर मोर्चा आणण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)