जुन्या पेन्शन योजनेसाठी अर्थमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: December 20, 2015 11:34 PM2015-12-20T23:34:38+5:302015-12-20T23:35:37+5:30
जुन्या पेन्शन योजनेसाठी अर्थमंत्र्यांना निवेदन
दिंडोरी : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधिमंडळावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. ११ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागललेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना मान्य नसून, १९८२ साली कायदा करून विहित केलेली जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातून एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सचिन वडजे, जिल्हा सरचिटणीस बाजीराव कमानकर यांनी दिली.
मोर्चाची सुरुवात नागपूर येथील यशवंत स्टेडियमपासून करण्यात आली. विधिमंडळाजवळील चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेला शिक्षक आमदारांसह एकूण १७ आमदारांनी हजेरी लावली व जुन्या पेन्शनच्या मागणीला पाठिंबा दिला. या प्रसंगी बोलताना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले की, राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर राज्य सरकारच्या सेवेत लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना तत्कालीन मंत्रिमंडळाने अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला कुठलीही सुरक्षितता पुरवण्यात आलेली नाही. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कुटुंबाला कुठलेही लाभ मिळणार नाहीत. अंशदायी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना मान्य नसून राज्यात सर्वत्र या योजने विरुद्ध संतापाची भावना आहे. यानंतर संघटनेच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये वितेश खांडेकर, गोविंद उगले, राजेंद्र लांडगे आदि राज्य पदाधिकारी सहभागी होते.(वार्ताहर)
नागपूर मोर्चात नाशिक जिल्ह्यातून राज्य संपर्क प्रमुख- एल.एल.भंडारे, राज्य मुख्य संघटक -प्रवीण गायकवाड, कार्याध्यक्ष - निलेश नहीरे, कोषाध्यक्ष -सौरभ अहिरराव, प्रसिद्धीप्रमुख संदीप शिरसाठ, संपर्क प्रमुख जावेद कारभारी, जिल्हा उपाध्यक्ष ङ्क्त राहुल गांगुर्डे, संतोष शेळके, कल्पेश चव्हाण,अनिल भरीतकर, विलास खैरनार, जिल्हा प्रतिनिधी- किरण शिंदे, जनार्दन केकरे, माणकि आव्हाड, प्रमोद राठोड, मनोहर भोये, मनोहर कांबळे, संदीप होळकर,अमोल गजबार, माधव नाईकवाडे, नितीन शिंदे, गणेश पारखे.अमोल साळवे , दिगंबर बादाड, अनिल सांगळे, अनिल आव्हाड, जमीर सैय्यद , वैभव गगे, बंटी भोये आदी सहभागी झाले होते.