वाघेरा घाटात जखमी गिधाड ‘रेस्क्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:47 AM2019-12-31T00:47:41+5:302019-12-31T00:51:01+5:30
नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घेत गिधाडाला सुरक्षित रेस्क्यू केले.
नाशिक : नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घेत गिधाडाला सुरक्षित रेस्क्यू केले. वनविभागाच्या नाशिक पश्चिम कार्यालयात जखमी गिधाडावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.
लांब चोचीच्या प्रजातीमधील कमी वयाच्या एका गिधाडाचा अंदाज चुकल्याने झाडांच्या फांद्यावर किंवा डोंगराच्या कपारीवर आदळून जमिनीवर कोसळले. याबाबत वाघेरा घाटातील आदिवासी नागरिकांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली. चिंचवड-नाकेपाडा येथून त्वरित त्र्यंबकेश्वर वनक्षेत्रपाल कार्यालयाला याबाबत माहिती समजली. त्यानंतर तत्काळ वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, सागर पाटील, अभिजित वाघचौरे या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लांब चोचीचे अवघ्या काही महिन्यांचे गिधाड जवळपास बेशुद्धावस्थेत त्यांना आढळून आले. रक्तस्त्राव अधिक झाल्याने तसेच शरीरातील पाणी कमी होऊन गिधाडाची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याचे लक्षात येताच तत्काळ त्याला वनविभागाच्या वाहनातून नाशिकच्या अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. जखमेवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहे, मात्र जखम गंभीर असल्यामुळे हे गिधाड पुन्हा आकाशात भरारी घेईल का? अशी भीती व्यक्त होत आहे. मागील दोन दिवसांपासून वन विभागाच्या कार्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी, हरसूल, बोरगड या भागांमध्ये गिधाडाचा आजही अधिवास आहे, हे शुभवर्तमान आहे. गिधाड संरक्षणासाठी वन विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ घोषित करण्याच्या हालचाली मंदावल्याचे चित्र आहे.