गोदापात्रात बसमध्ये अडकलेल्या १९ प्रवाशांचे रेस्क्यू! गंगाघाटावरील घटना, पोलीस, नागरिक अन् जीवरक्षक दलाची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 07:37 AM2022-09-03T07:37:02+5:302022-09-03T07:37:16+5:30
Nashik News: गोदावरीला असलेल्या वाहत्या पाण्यात अडकल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या तब्बल १९ प्रवाशांना पंचवटी पोलीस डेल्टा मोबाइल कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी साखळी पद्धतीने रेस्क्यू करून सुखरूपपणे बाहेर काढले.
पंचवटी : राजस्थान येथून नाशिकला देवदर्शनासाठी शुक्रवारी (दि. २) पंचवटीत भाविकांना घेऊन आलेली खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या खोल खड्ड्यात गोदावरीला असलेल्या वाहत्या पाण्यात अडकल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या तब्बल १९ प्रवाशांना पंचवटी पोलीस डेल्टा मोबाइल कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी साखळी पद्धतीने रेस्क्यू करून सुखरूपपणे बाहेर काढले.
राजस्थान येथून ओम ट्रॅव्हल्स कंपनीची बस शुक्रवारी पंचवटीत भाविकांना दर्शनासाठी घेऊन आलेली होती.
शुक्रवारी दुपारी चार वाजता गंगाघाट, रामकुंड येथे भाविकांचे दर्शन आटोपल्यावर बसचालक भाविकांना घेऊन तपोवनात दर्शनासाठी जात होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीपात्राला वाहते पाणी आहे. बस पाण्यातून सहज निघून जाईल, असे काही रिक्षाचालकांनी सांगितल्याने बसचालकाने वाहत्या पाण्यातून बस गाडगे महाराज पटांगणावरून नेली. मात्र, बस गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या खड्ड्यात अडकली. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे बसचालकाला बस पुढे हलविता येईना. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच त्यांनी पंचवटी डेल्टा मोबाइलला माहिती कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डेल्टा मोबाइलवरील पोलीस शिपाई संदीप घुगे, पोलीस शिपाई प्रकाश पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाहत्या पाण्यात अडकलेली बस प्रवाशांसह बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. मात्र, वाहत्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बस बाहेर काढण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर महिला, पुरुष प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.
बसमध्ये ज्येष्ठांसह दिव्यांग
पोलीस कर्मचाऱ्यांसह काही स्थानिक नागरिक व जीवरक्षक दलाच्या जवानांनी मानवी साखळी करून बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. बसमध्ये एकूण १९ प्रवासी होते. त्यातही बहुतांश ज्येष्ठ नागरिक तर काही दिव्यांग होते. बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने बसदेखील पाण्याबाहेर काढण्यात आली.