रेस्क्यू : उष्माघाताने शेकडो फूट उंचीवरुन गिधाड कोसळले जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:46 PM2018-05-10T22:46:49+5:302018-05-10T22:46:49+5:30
दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही.
नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात उष्मा वाढला असून, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेकडो फूट उंचीवरून विहार करणारा गिधाड जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने दुर्मिळ होत चाललेल्या एका गिधाडाचे प्राण वाचविण्यात वनविभाग व वन्यजीवप्रेमींना यश आले.
दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही. शेतकऱ्यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना कळविली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली. तत्पूर्वी शहरामधील वन्यजीवप्रेमींसाठी कार्य करणा-या इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी वाडेकरांनी संपर्क साधत त्यांना बोलाविले. दरम्यान, फाउंडेशनचे अभिजित महाले, राहुल कुलकर्णी, दर्शन बनकर, शिवपुष्पजा कट्यारे यांनी घटनास्थळी पोहचून डिहायड्रेशन झालेले अत्यवस्थ गिधाड ताब्यात घेत तत्काळ गिधाडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे दीड ते दोन तास साधे पाणी, ग्लुकोजमिश्रित पाणी व नारळपाणी वन्यजीवप्रेमींनी गिधाडाला दिले. त्यानंतर गिधाडाला एकांतात मानवी संपर्कापासून लांब अंधाºया खोलीत ठेवले. दोन दिवस गिधाडाची देखभाल केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गिधाडाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी भरपूर खाद्य देण्यात आले. त्यानंतर तासाभराने गिधाडाला त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी शिवारातील डोंगररांगेमध्ये मुक्त करण्यात आले. अवघ्या काही सेकंदात शक्तिशाली गिधाडाने आकाशात भरारी घेत आपल्या विशिष्ट आवाजाने जणू त्याची शुश्रूषा करणाºयांना धन्यवादच दिले. अवघ्या दहा मिनिटांत या गिधाडाभोवती चार ते पाच गिधाडे आकाशात जमा झाली होती आणि ते सगळे डोंगरापलीकडे निघून गेल्याची माहिती महाले यांनी दिली.
वनविभागाशी संपर्क साधावा
शहराच्या कमाल तपमानात वाढ झाल्याने शहर व परिसरात कुठल्याही ठिकाणी अत्यवस्थ अवस्थेत जर कुठलाही पक्षी आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वनविभागाशी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास संभवण्याचा धोका असतो.