संशोधन : संसर्ग टाळण्यासासाठी हॅण्डवॉश व सॅनिटायझर युनिटची केली निर्मिती नळाला स्पर्श न करताही हात धुणे होणार शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:02 AM2020-06-01T02:02:14+5:302020-06-01T02:02:28+5:30
नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वारंवार हात साबनाने व पाण्याने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, बऱ्याच खासगी अथवा शासकीय आस्थापनांची कार्यालये अथवा कारखान्यांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी एकाच ठिकाणी साबण आणि नळाची व्यवस्था केलेली असते.
नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वारंवार हात साबनाने व पाण्याने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, बऱ्याच खासगी अथवा शासकीय आस्थापनांची कार्यालये अथवा कारखान्यांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी एकाच ठिकाणी साबण आणि नळाची व्यवस्था केलेली असते. अशाप्रकारामुळे संसर्गाला आळा बसण्याऐवजी उलट संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिकमधील पंचवटी भागातील एका व्यावसायिकाने पाण्याच्या नळाला व साबणाच्या द्रवाला कोणताही स्पर्श न करता हात धुण्याची यंत्रणा (हॅण्डवॉश स्टेशन युनिट) विकसित केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी पंचवटीतील व्यावसायिक संदीप लोंढे यांनी उच्च दर्जाचे मोबाइल हॅण्डवॉश स्टेशन युनिट विकसित केले असून, या उपकरणामुळे कोरोना विरोधातील लढ्यालाही बळ मिळणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेकडून कोरोनाविरोधात लढा सुरू असून, या संशोधनामुळे नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. शहरातील विविध रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कम्पाउंड गेट, भिंती आदींना ठिकाणांना व्यक्तीचा अनेकदा स्पर्श होतो. अशावेळी हातांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोबाइल हॅण्डवॉश स्टेशन युनिटचा वापर होऊ शकतो असा दावा संदीप लोंढे यांनी केला आहे. या उपकरणाद्वारे पाण्याचा वापर कमी प्रमाणात होत असून, त्याची वाहतूक करणेही सोयीचे असल्याचने विविध खासगी व शासकीय आस्थापनांसोबत कारखाने व विविध धामिक स्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरही हातांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे उपकरण अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचा दावा संदीप लोंढे यांनी केला आहे.