नाशिक जिल्ह्यातील 15 पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:27 PM2019-12-21T16:27:17+5:302019-12-21T16:33:05+5:30
पंचायत समित्यांच्या सभापतींना शासनाने दिलेली अडीच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीसाठी पंचायत समित्यांचे आरक्षण काढण्यास शासनाने मान्यता दिल्यांनंतर शनिवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले.
नाशिक : पंचायत समित्यांच्या सभापतींना शासनाने दिलेली अडीच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीसाठी पंचायत समित्यांचे आरक्षण काढण्यास शासनाने मान्यता दिल्यांनंतर शनिवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले. यात पाच पंचायत समित्यांमध्ये अनुसुचीत जमाती महिला प्रवर्गासाठी, चार पंचायत समित्यांसाठी अनुसुचित जमाती प्रवर्ग, तर दोन ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन ठिकाणी नागरिकांचा मगासप्रवर्ग (महिला), एक सर्वसाधारण (महिला ) व एक अनुसुचित जातीसाठी आरक्षण निघाले आहे. तर पंधरापैकी एकाही पंचायसमितीमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण न सुटल्याने सर्वलाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले नाही, त्यामुळे या गटातील पुरुष दावेदारांना आता आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड दि. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी करण्यात आली होती. त्यांची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पंचायत समित्यांच्या सभापतींना चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. पंचायत समित्यांची मुदत आठ दिवसांपूर्वी संपुष्टात आली असून, या संदर्भात शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा होती. मात्र तीन ते चार दिवसांपूर्वीच शासनाने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पंचायत समित्यांना आणखी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पंचायत समित्यांचे आरक्षण काढण्याचा कार्यक्रमही जाहीर केला. त्यानुसार शनिवारी सोडतीद्वारे सभापतींचे आरक्षण काढण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांपैकी निफाड पंचायतसमितीसाठी सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निघाले असून मालेगाव व नांदगावमध्ये नागरिकांचा मागास प्रर्व, सिन्नर व नाशिकसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),दिंडोरी ,कळवण, बागलाण, सुरगाणा,येवला याठिकाणी अनुसूचित जमाती (महिला), इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा-अनुसूचित जमाती व चांदवड पंचायत समितीतसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत निघाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्राबाहेर असलेल्या ८ पैकी केवळ निफाड या एकच पंचायत समीतीसाठी सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी संधी मिळाली आहे,तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी एकही जागेवर संधी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक सदस्यांना सभापतीपदासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
असे आहे आरक्षण
सर्वसाधारण (महिला )-निफाड,
नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी)- मालेगाव,नांदगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)- सिन्नर, नाशिक
अनुसूचित जमाती(एस टी महिला)- दिंडोरी ,कळवण, बागलाण ,सुरगाणा ,येवला .
अनुसूचित जमाती(एस टी)- इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,पेठ, देवळा.
अनुसूचित जाती(एस सी)-चांदवड